देशानं पहिल्यांदाच पोलीस बॉम्ब ठेवताना अन् गृहमंत्री हप्ता वसुली करताना पाहिलं : जावडेकर

मुंबई : माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग (Param Bir Singh) यांनी अनिल देशमुखांवर १०० कोटी वसुलीचे धक्कादायक आरोप लावले होते, या प्रकरणात अनिल देशमुखांना खुर्चीवरून पायउतार व्हावं लागलं आहे. हायकोर्टाने या प्रकरणाची १५ दिवसांत प्राथमिक चौकशी करण्याचे आदेश सीबीआय(CBI) दिले आहेत. त्यानंतर अनिल देशमुखांनी नैतिकतेच्या आधारावर गृहमंत्रिपद सोडण्याचा निर्णय घेतला होता. मात्र या संपूर्ण प्रकरणामुळे भाजपा नेत्यांना ठाकरे सरकारवर टीका करण्याची आयती संधी सापडली होती.
या प्रकरणावर भाष्य करताना केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर म्हणाले की, अनिल देशमुख यांच्या राजीनाम्यामुळे उद्धव ठाकरे सरकारचं पितळ उघडं पडलं. देशाने पहिल्यांदाच पोलीस बॉम्ब ठेवताना आणि गृहमंत्री हप्ता वसुली करताना पाहिलं आहे असा टोला त्यांनी महाविकास आघाडी सरकारला लगावला आहे. तर दुसरीकडे केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनीही ठाकरे सरकारला धारेवर धरलं आहे. स्वातंत्र्य भारतात असं कधीही घडलं नव्हतं. आता या प्रकरणात अनेकजणांची नावं पुढे येतील. उद्धव ठाकरे सरकारने याची जबाबदारी घ्यायला हवी असं त्यांनी म्हटलं आहे.




