Top Newsराजकारण

वैयक्तिक टीका केली तर जशास तसे उत्तर; शिवसेना नेत्यांचा नारायण राणेंना इशारा

कुडाळ : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अटकनाट्यानंतर राणेंची जनआशीर्वाद यात्रा आज पुन्हा सुरु झाली. यावेळी राणे यांनी पुन्हा एकदा शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधलाय. त्यानंतर आता शिवसेना नेते उदय सामंत आणि आमदार वैभव नाईक यांनी नारायण राणेंना इशारा दिलाय. संघर्ष टाळण्यासाठी तशाच पद्धतीने वागलं पाहिजे, भूमिका घेतली पाहिजे. आमची भूमिका प्रामाणिक आहे. जशी अ‍ॅक्शन तशी रिअ‍ॅक्शन व्यक्त होत असते, अशा शब्दात उदय सामंत याांनी राणेंना इशारा दिला.

जन-आशीर्वाद कुणी काढावी हा त्यांचा वैयक्तिक मुद्दा आहे. त्यांना केंद्रीय स्तरावरून सांगितलं असेल. पण आम्ही ज्या पक्षात काम करतो त्या पक्षाला मानणारे नेते आहोत. उद्धव साहेबांना मानणारे नेते आहोत. उद्धव साहेब आमचं दैवत आहेत. त्यांच्यावर टीका होणार नाही याची दक्षता त्यांनी घेतली पाहिजे. संयम पाळला पाहिजे. तशी टीका झाली तर त्याचे परिणाम काय होतात हे चार दिवसांपूर्वी प्रत्येकाने बघितलं आहे, असा टोलाही सामंतांनी यावेळी लगावलाय. टीका जरी पुन्हा सुरू झाली असली तरी प्रत्येकाने संयमाने वागलं पाहिजे. जशी अ‍ॅक्शन तशी रिअ‍ॅक्शन व्यक्त होत असते. चांगल्या पद्धतीची अ‍ॅक्शन झाली तर रिअ‍ॅक्शनही तशी असेल, असंही सामंत म्हणाले. सिंधुदुर्गात जे दाखल होत आहेत त्यांनी जनतेचा आशीर्वाद घ्यावा. इंधन, गॅसचे दर कधी कमी होणार हे त्यांनी सांगावं. जीएसटीचा परतावा कधी मिळणार हे त्यांनी सांगावे, अशी टोलेबाजी सामंतांनी केलीय.

राणेंनी केलेल्या वैयक्तिक टीकेलाही सामंत यांनी उत्तर दिलंय. अशा पद्धतीची टीका यापूर्वीही झाली होती. त्यातूनही उद्धव ठाकरेंनी काम केलेले आहे. कोविडच्या काळात मुख्यमंत्री म्हणून त्यांनी केलेल्या कामाचा आदर्श देशाने घेतला आहे. त्याचे सगळ्याच पक्षांनी कौतुक केलं पाहिजे. वैयक्तिक टीका करण्यापेक्षा महाराष्ट्राच्या विकासासाठी काय हवे हे जनआशीर्वाद यात्रेत सांगितले पाहिजे. जे काही विधान झालं त्यांनतर त्याची काय प्रतिक्रिया उमटली ते देशाने पाहिलं आहे. त्यानंतर काही केंद्रीय नेत्यांचे फोन आले. हा विषय घडला त्यावर काय रिअ‍ॅक्शन येते हे शिवसैनिकांनी दाखवून दिले. जनआशीर्वाद यात्रा ही आशीर्वाद घेण्यासाठीच असावी, असंही सामंत म्हणाले.

वैभव नाईकांचाही इशारा

सुरुवातीलाच सांगितलं आहे की उद्धवजींवर टीका झाली तर त्याच पद्धतीनं उत्तर दिले जाईल. त्यावर आम्ही ठाम आहोत. पण आता बघितलं तर रत्नागिरीपासून सिंधुदुर्गात येईपर्यंत नाव न घेता टीका सुरू झालीय. पण सिंधुदुर्गात येईपर्यंत टीकाच होणार नाही याची आम्हाला खात्री आहे, असा टोला वैभव नाईक यांनी राणेंना लगावलाय. टीका झालीच तर त्याच पद्धतीनं उत्तर दिलं जाईल, असा इशाराही त्यांनी दिलाय. उद्धव ठाकरे यांचं नाव घेऊन टीका झाली तर संयम राहणार नाही, असंही नाईक म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button