व्होट बँकेच्या राजकारणाला भाजप घाबरत नाही : अमित शाह

मिर्झापूर : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज एक दिवसीय उत्तर प्रदेश दौऱ्यावर आहेत. मिर्झापूर येथे बोलताना ते म्हणाले, यापूर्वी व्होट बँकेच्या राजकारणामुळे अनेक कामे झाली नाहीत. मात्र, भाजप व्होट बँकेच्या राजकारणाला घाबरत नाही. बऱ्याच दिवसांनंतर उत्तर प्रदेशात आलो आहे. पण जेव्हा केव्हा येतो, तेव्हा घरी आल्यासारखे वाटते. याच उत्तर प्रदेशने २०१४, २०१७ आणि २०१९ मध्ये संपूर्ण बहुमताचे सरकार दिले आहे.
उत्तर प्रदेशची अपेक्षा आणि आवश्यकता काय आहेत, हे मोदीजींना पूर्णपणे माहीत आहे. ५५० वर्षांपासून रखडून पडलेल्या राम मंदिराची सुरुवात मोदीजींनी केली. भाजप सरकारने प्रत्येक परंपरा जिवंत केली आहे. आपल्या आस्थेचा सन्मान का होत नाही, असा प्रश्न लोक करत होते. विरोधकांवर हल्ला चढवताना शाह म्हणाले, माझा प्रश्न आहे, राम मंदिर का बांधण्यात आले नाही? विंध्यवासिनीचे काम का झाले नाही?
तत्पूर्वी शाह यांनी, विंध्याचलमध्ये विंध्यवासिनी मंदिरात पूजा केली. याच बरोबर, आज सकाळी अमित शाह यांनी लखनौ येथे फॉरेन्सिक सायन्स विद्यापीठाचे भूमिपूजन केले. यावेळी विरोधकांवर निशाणा साधताना, निवडणुका आल्या, की सक्रीय होणाऱ्या नेत्यांची सर्वात जास्त संख्या उत्तर प्रदेशातच आहे, असे ते म्हणाले. यावेळी योगी सरकारचे कौतुक करताना ते म्हणाले, योगी सरकारमध्ये महिला सुरक्षित आहेत. त्या आधी नव्हत्या. उत्तर प्रदेशात नेहमीच दंगली व्हायच्या, मात्र, आता दंगली होत नाहीत. योगींनी राज्यात कायद्याचे राज्य कायम केले.