राजकारण

भाजपमध्ये गेलेल्या नेत्याला गोमुत्राने धुवून काढतात काय? अजितदादांची टोलेबाजी

सातारा : त्यांच्या पक्षात माणूस गेला की तो धुतल्या तांदळासारखा स्वच्छ होतो. त्याच्यावर गोमूत्र शिंपडून त्याला अंघोळ घालतात की काय माहीत? पण इतर पक्षात गेला की चौकशी सुरू होते, अशी जळजळीत टीका राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपवर केली.

राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहे. वाई शहरामध्ये आज विविध विकास कामांचे भूमिपूजन आणि कोविड योध्याचा सन्मान सोहळा होता. या वेळी बोलत असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपवर सडकून टीका केली.

त्यांचा पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात असला की त्याची चौकशी लागते. बऱ्याच जणांची चौकशी लागलेली आहे, ते तिकडे गेले आणि काहींना आमदार की मिळाली काहींना मंत्रिपद मिळालं. त्यांच्यावर लागलेल्या चौकशी सुद्धा बंद झाली. हे चाललेलं राजकारण न समजण्या इतकी जनता दूधखुळी नाहीये, सूज्ञ आहे त्यांना या सगळ्या गोष्टी कळतात, असा टोला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लगावला.

मी कधीच चुकीचं करा असं सांगणार नाही. मी कधी चुकीचं समर्थन करणार नाही. पण काही जण कारण नसताना लोकांची बदनामी करत असतात. लोकांना खोटं सांगितलं जात, सारखं खोटं सांगत राहिला की लोकांनी खरं वाटायला लागतं, असा दुर्दैवी प्रकार राज्याच्या राजकारणात सुरू आहे, असं म्हणत अजित पवारांनी भाजपवर टीका केली.

सगळ्या साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांचं समाधान होईल असा भाव दिला पाहिजे. शरद पवार आणि राष्ट्रवादीने अख्या महाराष्ट्राचं सहकार तुमच्या हातात दिलंय. कोणताही भेदभाव न करता साखर कारखाना राष्ट्रवादी विचाराचा असला तरी कारवाई करा, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांना जाहीरपणे सांगितलं.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button