एअर इंडियाला मिळणार टाटांचा आधार !

नवी दिल्ली: गेल्या अनेक दिवसांपासून संपूर्ण आर्थिक जगताचे लक्ष लागून राहिलेल्या एअर इंडियाच्या खासगीकरणावर अखेर शिक्कामोर्तब झाले आहे. एअर इंडिया आता पुन्हा एकदा टाटा समुहाच्या ताब्यात जाणार आहे. एअर इंडियाच्या विक्रीसाठी स्थापन करण्यात आलेल्या सरकारी समितीने टाटा समुहाच्या निविदेला मंजुरी दिली. जेआरडी टाटा यांनी १९३२ साली टाटा एअरलाईन्स कंपनी स्थापन केली होती. मात्र, काँग्रेस सरकारच्या काळात या कंपनीचे सार्वजनिकीकरण झाले होते. त्यामुळे कंपनीचे नाव बदलून एअर इंडिया असे करण्यात आले होते. मात्र, आज ६८ वर्षांनंतर ही कंपनी पुन्हा एकदा टाटा समुहाच्या ताब्यात आली आहे.
टाटा सन्सबरोबरीनेच, स्पाइसजेटचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक अजय सिंग हे स्पर्धेत होते. टाटा समुहाने एअर इंडियाच्या खरेदीसाठी तब्बल ५००० कोटी रुपये मोजण्याची तयारी दर्शविल्याचे सांगितले जाते. एअर इंडियासाठी विक्रीसाठी लावण्यात आलेल्या आर्थिक बोलीत ८५ टक्के हिस्सा हा कंपनीवरील कर्जदायित्वासाठी, तर १५ टक्के हा रोख रूपात सरकारी तिजोरीत येण्याचे अंदाजण्यात येत आहे. एअर इंडिया टाटा समूहाच्या ताब्यात गेल्याने आता मरगळ आलेल्या भारतीय हवाई सेवा क्षेत्रात चैतन्य संचारण्याची शक्यता आहे. एअर इंडियाची विक्री हे केंद्र सरकारच्या खासगीकरण मोहिमेतील एक मोठे यश मानले जात आहे.
निर्गुंतवणुकीची प्रक्रिया जानेवारी २०२० पासून सुरू झाली होती ती कोविड १९ महामारीमुळे स्थगित झाली. सरकारने संभाव्य बोलीदारांना एप्रिल २०२१ मध्ये आर्थिक बोली सादर करण्यास सांगितले होते. १५ सप्टेंबर हा निविदा सादर करण्याचा शेवटचा दिवस होता. टाटा समूह अशा कंपन्यांपैकी एक होता ज्यांनी डिसेंबर २०२० मध्ये एअरलाइन खरेदी करण्यासाठी इंटेलिशन एक्स्प्रेशन ऑफ इंटरेस्ट (ईओआय) दिला होता.
२००७ मध्ये देशांतर्गत विमान कंपनी इंडियन एअरलाइन्समध्ये विलीन झाल्यापासून एअर इंडिया तोट्यात आहे. एअरलाइनसाठी यशस्वी बोली लावणाऱ्याला देशांतर्गत विमानतळांवर ४,४०० देशांतर्गत आणि १,८०० आंतरराष्ट्रीय लँडिंग आणि पार्किंग स्लॉट तसेच परदेशी विमानतळांवर ९०० स्लॉटचे नियंत्रण मिळेल. याव्यतिरिक्त कंपनीला एअरलाइनच्या कमी किमतीच्या सेवा एअर इंडिया एक्सप्रेसची १०० टक्के मालकी आणि AISATS ची ५० टक्के मालकी मिळेल. AISATS प्रमुख भारतीय विमानतळांवर कार्गो आणि ग्राउंड हँडलिंग सेवा पुरवते.




