नवी दिल्ली: देशातील आघाडीचे उद्योगपती गौतम अदानी (Gautam Adani) यांच्या कंपनीला राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून (NHAI) रस्ता बांधणीचे मोठे कंत्राट मिळाले आहे. तेलंगणातील कोडाड ते खम्मम या तब्बल 1039.90 कोटीं खर्चाच्या राष्ट्रीय महामार्गाच्या बांधणीचे काम आता अदानी रोड ट्रान्सपोर्ट लिमिटेडकडून (ARTL) केले जाईल. या कंत्राटामुळे अदानी यांच्या कंपनीचा मोठा फायदा होणार असून त्यांनी आता संपत्तीच्याबाबतीत जेफ बेझोस यांची पत्नी मॅकेन्झी स्कॉट यांनाही मागे टाकल्याचे समजते.
अदानी रोड ट्रान्सपोर्ट कंपनीकडून या कंत्राटासंदर्भात माहिती देण्यात आली. भारतमाला योजनेतंर्गत या महामार्गाचे काम केले जाणार आहे. या प्रकल्पात चौपदरी मार्ग उभारला जाणार असून आगामी दोन वर्षांत या मार्गाची उभारणी होईल, असे अदानी रोड ट्रान्सपोर्ट कंपनीकडून सांगण्यात आले. अदानी समूहाचे अध्यक्ष असणाऱ्या गौतम अदानी यांच्या संपत्तीत गेल्या वर्षभरात मोठी भर पडली आहे. जगातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्तींच्या यादीत त्यांनी 21 व्या स्थानावर झेप घेतली आहे. लॉकडाऊनच्या काळात गौतम अदानी यांनी दिवसाला 456 कोटी रुपये कमावल्याचं पाहायला मिळत आहे. कोरोना आणि लॉकडाऊनच्या काळात गौतम अदानी यांच्या 4 कंपन्यांनी मोठी कमाई केली आहेत. त्यात अदानी गॅस, अदानी एंटरप्रायजेस , अदानी पोर्ट आणि अदानी पॉवर या कंपन्यांचा समावेश आहे.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या अखत्यारित येणारे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) सध्या अनेक नवे विक्रम रचत आहे. काही दिवसांपूर्वीच NHAI ने दिल्ली- वडोदरा-मुंबई द्रुतगती महामार्गाच्या काँक्रीटीकरणाचे काम विक्रमी वेळेत पूर्ण केले होते. दिल्ली- वडोदरा-मुंबई द्रुतगती महामार्ग तयार करताना 24 तासांच्या कालावधीत झालेल्या कामामुळे चार विक्रम मोडीत निघाले आहेत. NHAI ने काँक्रिटच्या साहाय्याने एक्स्प्रेस वे बांधण्याचा विश्वविक्रम मोडीत काढला आहे. देशात वेगाने पायाभूत सुविधा उभारण्याचे काम करताना आम्ही केवळ नवे मापदंड निर्माण करुन थांबलो नाही तर जागतिक विक्रमही मोडीत काढल्याची माहिती नितीन गडकरी यांनी दिली होती.