अभिनेता कमल हसन यांचा पराभव

चेन्नई : अभिनेता कमल हसन यांचा कोईंबतुर दक्षिण विधानसभा मतदारसंघात पराभव झालाय. भाजपच्या महिला मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्ष वनाथी श्रीनिवासन यांनी त्यांचा पराभव केला. वनाथी यांनी पहिल्या क्रमांकाची मतं मिळवत विजय मिळवलाय. तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत कोईंबतुर दक्षिण मतदारसंघ चर्चेचा विषय ठरला होता. कारण येथून ‘मक्कल नीधि मय्यम’चे संस्थापक आणि भारतीय चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते कमल हसन निवडणूक रिंगणात होते. मतमोजणीच्या सुरुवातीपासून कमल हसन आघाडीवर होते, मात्र अखेरिस भाजपच्या वनाथी यांनी त्यांना मागे टाकत विजय मिळवला
कमल हसनने २०१८ मध्ये मक्कल नीधि मय्यम हा राजकीय पक्ष स्थापन केला होता. त्यानंतर त्यांनी २०१९ ची लोकसभा निवडणुकही लढली. मात्र, त्यांना एकाही मतदारसंघात विजय मिळवता आला नाही. असं असलं तरी लोकसभेत काही मतदारसंघांमध्ये त्यांच्या पक्षाच्या उमेदवारांनी तिसऱ्या किंवा चौथ्या क्रमांकाची मतं मिळवली. २०१९ मध्ये लोकसभा निवडणुकीत ‘मक्कल नीधि मय्यम’ पक्षाला एकूण १५ लाख ७५ हजार मतं मिळाली होती.
कमल हसन सुरुवातीपासून ते राजकारणासाठी नसल्याचं म्हणत आलेत. मात्र, नंतर त्यांनी राजकारणात उडी घेतली. २१ फेब्रुवारी २०१८ रोजी त्यांनी मदुरैमध्ये आपल्या पक्षाची घोषणा केली. त्यावेळी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासह अनेक नेते त्यांच्यासोबत होते. कमल हसन यांच्या मक्कल नीधि मय्यम पक्षाने २०१९ मध्ये लोकसभा निवडणूकही लढली. मात्र, त्यांना एकही जागेवर विजय मिळवता आला नाही. मात्र, जनतेने त्यांना भरभरुन मतं दिली.
कमल हसन यांनी वयाच्या ६ व्या वर्षापासून अभिनयाला सुरुवात केली. आतापर्यंत त्यांनी तब्बल २२० चित्रपटांमध्ये काम केलंय. अभिनेता म्हणून उत्तम अभिनयाच्या जोरावर त्यांनी असंख्य पुरस्कार मिळवले आहेत. त्यांना या योगदानासाठी पद्मश्री आणि पद्मभूषण पुरस्कारानेही गौरवण्यात आलंय.




