महाराष्ट्रातील आदिवासी समाजाची आगळी-वेगळी होळी

मुंबई : देशात होळीचा उत्सव मोठ्या आनंदात आणि उत्साहात साजरा केला जातो. महाराष्ट्रात देखील होळीचा उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा होतो. होळीचा उत्सव शहराहून वेगळा खेड्यात, आणि खेड्यातून कितीतरी पटींनी वेगळा आदिवासी पाड्यांत साजरा केला जातो. महाराष्ट्रात अंध, आरख, गोंड, काथोडी, भानिया, धोडीया अशा जमातींच्या आदिवासींचे प्रमाण एकूण लोकसंख्येच्या ८.६१% आहे. संख्येने जरी कमी असले तरी परंपरांचा अमूल्य ठेवा हे आदिवासी जपून आहेत. एका जमातीच्या परंपरा, रूढी दुसरीहून भिन्न असतात मात्र सगळ्याच आदिवासी जमातींमध्ये होळीचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. सगळ्यांचाच होळी प्रती असलेला दृष्टिकोन अतुलनीय आहे.
पौर्णिमेपासून अमावास्येपर्यंत, काही भागात पुढच्या पौर्णिमेपर्यंत हा उत्सव चालतो. निसर्गाशी खूप जवळचे नाते सांगणाऱ्या या आदिवासी होळीचा संबंध चंद्राच्या कलेशी, प्रजननाशी, शेतीशी, वंशसातत्याशी, नव्या नात्यांशी आणि निर्भेळ आनंदाशी आहे. होळी साजरी करण्याची खास पद्धत असलेल्या पावरा,काथी आणि कोरकू या जमातींविषयी जाणून घेऊया.
जळगाव नजीकच्या यावल येथे महिनाभर होळीचा उत्सव चालतो. हाताने तयार केलेला पूर्ण नैसर्गिक गुलाल खेळत सगळी आदिवासी जनता महिनाभर उत्सवात दंग असते. महिनाभर चालणाऱ्या या उत्सवात पावरा समाजातील मुले अलंकार धारण करून गावभर आपल्या भावी वधूचा शोध घेत फिरतात आणि जी मुलगी त्यांना पसंत करेल तिच्याशी विवाहबद्ध होतात. कमरेला डमरू बांधलेले हे भावी नवरदेव बघायला आबालवृद्ध जमा होतात. सातपुड्याच्या डोंगर रांगांमधील होळी आदिवासी समाजातील भव्य होळ्यांमधील एक समजली जाते. सतत पंधरा दिवस चालणाऱ्या या होळी उत्सवात प्रत्येक गावातील/ पाड्यातील होळीचे भल्या पहाटे सूर्योदयासोबत दहन करत तब्बल दीड लाख आदिवासी एका गावात जमतात. या काथी होळीत दहन करण्यासाठी कीड न लागलेला निरोगी बांबू महिनाभर आधी जंगलातून शोधून आणला जातो. हत्यार न वापरता, बांबू आणि घरातील सरपणाची लाकडे वापरून बांधलेली ही होळी जेव्हा पेट घेते तेव्हा हा बांबू सगळ्यात शेवटी एका दिशेला पडतो. तो ज्या दिशेला पडेल त्यावरून गावचे धार्मिक पुढारी पुढल्या वर्षीचा पाऊस, शेती इत्यादींची
भाकिते करतात.
अमरावतीजवळच्या धारणी मध्ये आदिवासी होळीत फगवा मागण्याची पद्धत आहे. एरव्ही शहरात राहणारा या समाजाचा कामगारवर्ग होळीला आवर्जून फगवा म्हणजे सणासाठी देणगी मागतात; विशेष पारंपरिक वाद्ये वाजवतात आणि पारंपरिक सुसुन-गादुली नावाचे नृत्य करतात. कोकणात होळीला सावरीच्या झाडाचा एक फोक वापरला जातो. सावरीचा फोक जितका मोठा तितकी होळी मोठी. हा फोक दहनाआधी नाचवला जातो. यथासांग पूजा होऊन
मगच त्याचे दहन होते. काही ठिकाणी दहन होत देखील नाही. प्रत्येक आदिवासी जमातीत जो प्रमुख असेल त्याचा पूजेचा पहिला मान असतो.
होळीचे हे रूप पौराणिक देवतेच्या कथेपेक्षा निसर्गदेवतेच्या/ आदिवासी कुलदेवतांच्या पूजनाला अधिक महत्त्व देणारे आहे. शिवाय त्यांना हा १५ ते ३० दिवसांचा कालावधी खूप श्रमांनंतरचा आराम म्हणून मिळतो. अशा वेळी मोहाचे मद्य पिणे, मांस भक्षण करणे, नृत्य-वादन, आवडती वेशभूषा करणे हे त्यांचे आवडते उपक्रम असतात.शेतीची व अन्य कामे संपवून चांगल्या उत्पन्नाची वाट पाहत, नवीन वर्षाचे आडाखे बांधत शरीर-मनाला विश्रांती देणारी ही होळी म्हणून विशेष ठरते.