तंत्रज्ञान

हॅकिंग, डाटाचोरी प्रकारांवर आता माहिती तंत्रज्ञान कायद्याबरोबरच ‘आयपीसी’चे गुन्हे

सुप्रीम कोर्टाचा महत्वपूर्ण निर्णय

नवी दिल्ली : संगणक हॅक करणे, त्यातील माहिती चोरणे, अशा कृत्यांबद्दल माहिती तंत्रज्ञान कायद्याबरोबरच भारतीय दंडविधाना (‘आयपीसी’) ची कलमे लागू होतात. माहिती तंत्रज्ञान कायद्यांमुळे आयपीसी लावण्यास कोणताही प्रतिबंध नाही, असा निर्णय सुप्रीम कोर्टाचे न्या. दिनेश माहेश्वरी आणि अनिरुद्ध बोस यांनी दिला आहे.

मे.टी.सी.वाय. लर्निंग सोल्युशन्स प्रा.लि. ही ऑनलाइन शिक्षण देणारी कंपनी आहे. गेल्या १० वर्षांपासून ती या क्षेत्रात कार्यरत असून, कंपनीने स्वत:चे सॉफ्टवेअर बनवलेले आहे.२०१५ मध्ये रमणदीपसिंग हे या कंपनीमध्ये मार्केटिंग मॅनेजर म्हणून रुजू झाले. पुढे त्यांनी कंपनी सोडली. २०१८ मध्ये त्यांनी जगजित सिंग, रूपेंदर सिंग यांच्यासोबत मिळून मे. एक्सोवेज वेब टेक्नॉलॉजी प्रा.लि. ही कंपनी बनवली. ही कंपनीदेखील विद्यार्थी व कोचिंग क्लासेसना ऑनलाइन इंग्रजी शिक्षण देणारी कंपनी आहे.काही दिवसांनंतर टीसीवाय कंपनीस बाजारपेठेतून माहिती मिळाली की, एक्सोवेज त्यांच्यासारखेच सॉफ्टवेअर विकत आहे. यात अधिक तपास करता एक्सोवेजचे सॉफ्टवेअर हे टीसीवायच्या सॉफ्टवेअर कोडचा वापर करून बनवल्याची खात्री झाली.

पंजाब सायबर क्राइम पोलीस ठाण्यात रमणदीपसिंह, जगजितसिंह व रूपेंदरसिंह यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला. या गुन्ह्यात आयपीसीची ४०६ (विश्वासघात), ४०८ (नोकराकडून विश्वासघात) ३७९ (चाेरी) ३८१ (नोकराने केलेली चाेरी) १२० (ब) (गुन्ह्याचा कट) यासह माहिती तंत्रज्ञान कायद्याची ४३ (हॅकिंग), ६६ ब (डाटाचोरी) ही कलमे लावण्यात आली. उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर प्रकरण सर्वोच्च न्यायालयात आले. गुन्हा फक्त मा.तं. कायद्याप्रमाणे होतो किंवा आयपीसीची कलमे लावता येतात, हा मुद्दा न्यायालयासमोर होता. यात आयपीसीची कलमे लावता येतात, असा निकाल कोर्टाने दिला.

फक्त साधी हॅकिंग असेल, तर यासाठी आयटी ॲक्ट लावला जातो. मात्र, यात चोरलेल्या माहितीचा अपहार झाल्यास त्यास शिक्षेची तरतूद नाही. त्यामुळे माहितीचा अपहार करणाऱ्या कंपनीच्या सर्व संचालकांविरुद्ध आयपीसीची कलमे लागतात. तक्रारीप्रमाणे नोकराने डाटाचोरी केली आहे. यांत ३८१ आयपीसी लागणार नाही तर काय लागणार? मुळात विश्वासघाताचा गुन्हा घडला असल्याने आयपीसीची विश्वासघातासंबंधीची कलमे लागणारच, असे सुप्रीम कोर्टाने निकाल देताना म्हटले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button