राजकारण

फडणवीस महाराष्ट्रासोबत नाहीत… ; नवाब मलिकांची खोचक टीका

मुंबई: तौक्ते वादळाचा फटका बसलेल्या कोकणाला पॅकेज मिळण्याच्या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली आहे. कोकणातील जनतेला भरपाई देणार आहोतच. परंतु, महाराष्ट्राला जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे आग्रह धरला पाहिजे. त्यांनी तसे केले तर ते राज्यातील जनतेसोबत आहेत हे सिद्ध होईल, असं सांगतानाच मात्र फडणवीस महाराष्ट्रासोबत नाहीत हे आता सिद्ध होवू लागले आहे, अशी खोचक टीका राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली आहे.

नवाब मलिक यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना ही टीका केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात आले नाहीत. मात्र गुजरातला 1 हजार कोटीचे पॅकेज दिले. आत्ता जनता प्रश्न निर्माण करू लागल्यावर आमच्यावर प्रश्न निर्माण केला जात आहे. आम्ही भरपाई देणारच आहोत, पण आधी फडणवीस यांनी मोदींकडे आग्रह धरला पाहिजे. महाराष्ट्राला जास्त मदत मिळवून दिली पाहिजे. ही त्यांची जबाबदारी आहे. मात्र फडणवीस केंद्राकडे आग्रह धरत नाही आणि राज्य सरकार काय देणार यावर फडणवीस बोलत आहेत, असा टोला त्यांनी लगावला. फडणवीस महाराष्ट्रासोबत आहेत की, भाजप नेत्यांना वाचवायला लागले आहेत हे त्यांनी सांगावे, असं ते म्हणाले.

विरोधी पक्ष वैफल्यग्रस्त मानसिकतेतून टीका करत आहे हे काल मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. राज्यसरकारची यंत्रणा, प्रशासन कोकणातील नुकसानीचा अंदाज घेत आहे. पंचनामे करत आहे. पालकमंत्री सातत्याने संपर्कात आहेत. मुख्यमंत्र्यांनी काही भागाचा दौरा केल्यानंतर त्याचा अंदाज पंचनाम्याच्या माध्यमातून येईल. त्यानंतर निश्चितरुपाने एनडीआरएफ, एसडीआरएफच्या स्टँडींग ऑर्डरपेक्षा अतिरिक्त मदत देण्याची राज्य सरकारची भूमिका असेल, असे मलिक यांनी स्पष्ट केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button