बार्ज दुर्घटनेतील मृतांचा आकडा ४१ वर; अद्याप ३४ जण बेपत्ता
कॅप्टन राकेश बल्लवसह इतरांवर गुन्हा दाखल

मुंबई : तौत्के चक्रीवादळामुळे मुंबईपासून १७५ किलोमीटर अंतरावर खोल समुद्रात बार्ज भरकटले होते. या दुर्घटनेत आता आणखी ४ जणांचे मृतदेह सापडले आहेत. त्यामुळे मृतांची संख्या ४१ वर पोहोचली आहे, तर आणखी ३४ जण बेपत्ता आहेत. नौदलाचे जवान बेपत्ता कर्मचार्यांचा शोध घेत आहेत.
मुंबईच्या खोल समुद्रात चार बार्जवर एकूण ७०७ खलाशी आणि कर्मचारी उपस्थित होते. या तराफ्यांचे नांगर तुटल्याने खवळलेल्या समुद्रात ते भरकटले होते. बार्ज भरकटल्याची माहिती मिळताच नौदलाने युद्धपातळीवर बचाव कार्य सुरू केले. आतापर्यंत ६११ जणांना वाचवण्यात नौदलाला यश आले आहे. अद्यापही बचावकार्य सुरूच आहे.
पी-३०५ या बार्जवर एकूण २६१ कर्मचारी होते. त्यापैकी १८८ कर्मचार्यांना नौदलाने वाचवले आहे. आयएनएस कोच्ची या युद्धनौकेच्या सहाय्याने या कर्मचार्यांना वाचवण्यात आले आहे. ताशी १०० किमी वार्याचा वेग असतानाही नौदलाने युद्धपातळीवर कार्य करून कर्मचार्यांना वाचवले आहे. गुरुवारी सकाळी काही कर्मचार्यांचे मृतदेह सापडले होते. तर दुपारी आणखी काही कर्मचार्यांचे मृतदेह सापडले आहे. आतापर्यंत एकूण ४१ जणांचे मृतदेह सापडले आहेत. आणखी ३४ जणांचा शोध सुरू आहे.
समुद्रात तौत्के चक्रीवादळ येणार याची पूर्व कल्पना असतानाही बार्ज पी-३०५ च्या कॅप्टनने बंदरावर परत न जाता समुद्रातच राहण्याचा चुकीचा निर्णय घेतल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ओएनजीसीच्या तेल उत्खनन प्रकल्पावर काम करण्याचे कंत्राट अॅफकॉन कंपनीकडे होते. याच अॅफकॉन कंपनीने नियुक्त केलेले २६१ कर्मचारी बार्ज पी-३०५ वर होते.
समुद्रात ओएनजीसीसाठी तेल उत्तखनन करणार्या पी – ३०५ बार्जला तौत्के चक्रीवादळाचा फटका बसला असून हे बार्ज समुद्रात बुडाल्यामुळे ३७ जणांचा मृत्यू झाला असून सुमारे ३८ जण अद्याप बेपत्ता असून त्यांचा शोध घेण्यात येत आहे. दोन दिवसापासून युद्धपातळीवर बचावकार्य सुरु आहे. बुधवारपासून मुंबईतील जे.जे रुग्णालयात ३७ जणांचे मृतदेह आणण्यात आले आहे. या प्रकरणी येलोगेट पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
कॅप्टन राकेश बल्लवसह इतरांवर गुन्हा दाखल
बार्ज पी-३०५ दुर्घटनेप्रकरणी मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बार्ज इंजीनिअर मुस्तफिजूर रहमान यांच्या तक्रारीवर कॅप्टन राकेश बल्लाव आणि इतरांवर गुन्ह्याची नोंद झाली आहे. हवामान विभागाच्या इशाऱ्यानंतरही राकेश बल्लव यांनी बार्जवरील कर्मचाऱ्यांचा जीव धोक्यात घातला, असा आरोप रहमान यांनी केला आहे. दरम्यान पोलीस राकेश बल्लाव यांचा शोध घेत आहेत.




