
मुंबई : अरबी समुद्रात घोंघावणारे ‘तौक्टे’ चक्रीवादळ अधिक सक्रीय झाले आहे. सध्या हे चक्रीवादळ गुजरातच्या दिशेने सरकत आहे. लक्षद्वीपजवळ निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचे चक्रीवादळात रुपांतर झाले आहे. येत्या १२ तासात चक्रीवादळ कोकण किनारपट्टीवर धडकणार आहे, अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर यांसह कोकण किनारपट्टीवर प्रशासनाने सावधानतेचा इशारा दिला आहे.
‘तौक्टे’ चक्रीवादळाचा सिंधुदुर्गाच्या किनारपट्टीवर प्रभाव
‘तौक्टे’ चक्रीवादळाचा सिंधुदुर्गाच्या किनारपट्टीवर प्रभाव जाणवत आहे. जिल्हा प्रशासनाकडून किनारपट्टीच्या ३८ गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पहाटे झालेल्या वादळी वारे आणि पावसामुळे वेंगुर्ल्यात अनेक ठिकाणी झाडांची पडझड होऊन घरांचे नुकसान झाले आहे. गोव्यात मडगाव, कुडचेडे, केपे, सांगे येथे आज पहाटे पावसाने दमदार हजेरी लावली. उत्तर गोव्यात म्हापसा, डिचोली इथे पाऊस पडला.
समुद्रात ‘तौक्टे’ चक्रीवादळ सध्या गुजरातच्या दिशेने सरकत आहे. या चक्रीवादळाची तीव्रता दुपारनंतर वाढणार आहे. सध्या अनेक ठिकाणी सोसायट्याचा वारा सुटला आहे. अनेक ठिकाणी ताशी ४० ते ५० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. तसेच मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर या ठिकाणीही पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मुंबईसह उपनगरात पहाटे पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. सध्या मुंबईत अनेक ठिकाणी काळ्या ढगांची गर्दी पाहायला मिळत आहे. त्यामुळे उकाड्यापासून त्रस्त झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. मुंबईत काल रात्रीपासून प्रचंड गार वारा सुटला होता. त्यानंतर पहाटेच्या सुमारास दक्षिण मुंबईसह उपनगरात पावसाच्या तुरळक सरी कोसळल्या. सद्यस्थितीत मुंबईत काळे ढग दाटून आले आहेत. त्यामुळे मुंबईकरांना सूर्यदेवाचे दर्शन होण्याची शक्यता कमी आहे.




