आरोग्य

‘म्युकरमायकोसिस’चा उपचार आता महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून होणार

जालना : कोरोनाचे नवे प्रकार आणि त्यामुळे होणारे नवनवे आजार आता समोर येत आहेत. अशावेळी म्युकरमायकोसिस नावाचा एक बुरशीजन्य आजार कोरोना रुग्णांमध्ये आढळून येत आहे. सुरतमध्ये दोन दिवसांपूर्वी म्युकरमायकोसिसचे ४० रुग्ण आढळून आले होते. तर त्याच दिवशी या आजाराची लागण झालेल्या ८ रुग्णांचे डोळे काढावे लागले होते. या आजाराबाबत ठाकरे सरकारनं मोठी घोषणा केली आहे. म्युकरमायकोसिस या आजाराचा समावेश राज्य सरकारच्या महात्मा फुले जनआरोग्य योजनेत करण्यात आला आहे. तशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलीय.

राज्य सरकारच्या या निर्णयामुळे कोरोना रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे. कोरोना रुग्णांमध्ये म्युकरमायकोसीस हा बुरशीजन्य आजार बळावत असल्याचं पाहायला मिळत आहे. या आजाराकडे दुर्लक्ष केल्यास माणूस दगावण्याची शक्यता असते. त्यामुळे यावर योग्य वेळी आणि योग्य उपचार घेणे महत्वाचे आहे. या आजाराचा समावेश महात्मा फुले जनआरोग्य योजनेत करण्यात आल्यामुळे या योजनेच्या माध्यमातून रुग्णांना आर्थिक मदत मिळणार आहे. त्यामुळे कोरोना रुग्णांसाठी ठाकरे सरकारचा हा निर्णय महत्वाचा मानला जात आहे.

म्युकर मायकोसिस हा आजार बुरशीचा संसर्ग आहे. जे लोक मोठा काळ आपल्या इतर आजारांचा उपचार घेत आहेत त्यांची वातावरणातील रोगजंतूंशी लढण्याची क्षमता कमी होते. अशावेळी या बुरशीचा संसर्ग होण्याचा धोका सर्वाधिक असतो. श्वासोच्छवासाद्वारे हे जंतू नाकातून फुफ्फुसात पोहचतात.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button