केंद्र-महाराष्ट्राच्या वादात शिवराज सिंह चौहान यांची उडी
ऑक्सिजन मशीन पुरवठा थांबवण्यासाठी महाराष्ट्र सरकारचा दबाव!

भोपाळ : देशात कोरोना संसर्गाने हैदोस घातला आहे. दररोज १ लाखाहून अधिक रुग्ण सापडत असून रुग्णसंख्या एक कोटीहून वर पोहचली आहे. या वाढत्या रुग्णसंख्येमुळे प्रशासनासमोरही नवे आव्हान उभे राहिले आहे. आत्तापर्यंत लाखो कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. असे असतानाही देशभरात कोरोना रुग्णसंख्या, ऑक्सिजन पुरवठा आणि रेमडेसिवीर इंजेक्शनवरून जोरदार राजकारण सुरु आहे. यात मध्य प्रदेश सरकारने आता महाराष्ट्र सरकारवर ऑक्सिजन पुरवठ्यावरून गंभीर आरोप केले आहेत. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी ऑक्सिजन मशीन पुरवठा थांबवण्यासाठी महाराष्ट्र सरकारचा दबाव असल्याचे सांगत ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. दबाव टाकला जातोय तसेच महाराष्ट्र सरकार ऑक्सिजन पुरवठा थांबवत आहे असा आरोप चौहान यांनी केला आहे.
मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी कोरोनासंदर्भात आढावा बैठक बोलावली होती. या बैठकीत त्यांनी मध्य प्रदेशने महाराष्ट्रातील ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर निर्माता कंपन्यांकडे ऑक्सिजन पुरवठ्याची ऑर्डर दिली होती. मात्र महाराष्ट्र सरकारने दबाव टाकल्याने ऑर्डर थांबवण्यात आली. त्यामुळे महाराष्ट्र सरकार मध्य प्रदेशला ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर मशीन पाठवणाऱ्या कंपन्यांवर दबाव टाकत आहेत. असा गंभीर आरोप शिवराज सिंह चौहान यांनी केला आहे.
या बैठकीत शिवराज सिंह चौहान यांच्यासह आरोग्य विभागाचे अधिकारीदेखील उपस्थित होते. यावेळी राज्यातील कोरोना स्थिती, उपलब्ध बेड्स, ऑक्सिजन पुरवठा, रेमडेसिवीर इंजेक्शन साठ्याची माहिती घेण्यात आली. याच बैठकीत बोलताना शिवराज सिंह चौहान यांनी मध्य प्रदेशात सध्या २००० ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर आले आहेत. तर ६५० कॉन्सनट्रेटर अजून येणार आहेत. १३०० कॉन्सनट्रेटर जिल्हास्तरावर खरेदी करण्यात आले आहेत. मात्र महाराष्ट्र सरकार ऑक्सिजन मशीन तयार करणाऱ्या कंपन्यांना मशीन मध्य प्रदेशला देण्याआधी महाराष्ट्राला पुरवठा करा असा दबाव टाकत आहे. असे त्यांनी म्हटले आहे.




