राज्यातील ६० हजारांवर कोरोना बळी हे मुख्यमंत्र्यांचे पाप : खा. नारायण राणे

मुंबई : देशात सर्वाधिक मृत्यूमध्ये महाराष्ट्र नंबर १ वर आहे. ४१ टक्के मृत्यू महाराष्ट्रात झाले आहेत. राज्यात कोरोना वाढत आहे. मात्र, महाराष्ट्र सरकार कोरोनावर उपाययोजना करायला, रुग्णांना आवश्यक औषधं द्यायला, कोरोना हाताळायला अपयशी ठरलं आहे. महाराष्ट्रात ६० हजार रुग्णांचा मृत्यू झाला आहे. हे पाप राज्य सरकारचं, मुख्यमंत्र्यांचं आहे, असा घणाघाती आरोप माजी मुख्यमंत्री, भाजप नेते खा. नारायण राणे यांनी केला. राज्यातील कोरोनाच्या परिस्थितीवर भाजप खासदार नारायण राणे यांनी राज्य सरकारसह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. मुख्यमंत्री मृतांची संख्या जाहीर करतात. जे नाही ते सांगतात. त्यापेक्षा ते उपलब्ध करा. मुख्यमंत्र्यांना जनाची नाही तर मनाची तरी आहे का? मातोश्रीच्या पिंजऱ्यातून बाहेर या, असा हल्लाबोल नारायण राणे यांनी केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे रडत लक्ष्मी, तर अनिल परब हे सेवाभावी आहेत, अशी टीकाही राणे यांनी केली आहे.
नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेत राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर जोरदार निशाणा साधला. ते म्हणाले की, कोरोना रोखण्यासाठी उपाय म्हणून वारंवार धमकी देत होते की, लॉडाऊन लागणार, जसं काय महाराष्ट्र विकत घेतला आहे, अशा पद्धतीने दमदाटी करत होते. अखेर शेवटी त्यांनी अघोषित संचारबंदी सुरु केली. संचारबंदीच्या निर्णयाने राज्यातील जनता समाधान होणार आहे का? त्यामुळे त्यांचं पालनपोषण होणार आहे का? दीड हजारात लोकांचं पोट कसं भरणार? राज्यातील कामगार उद्धवस्त होण्याच्या मार्गावर आहे. राज्यातील कोरोना बळींची वाढती संख्या हे उद्धव ठाकरे सरकारचं पाप आणि अपयश आहे, अशी टीका त्यांनी केली. दुकाने बंद करायची तर जीएसटी का आकारली जातेय? दुकानदारांना नोटीस का पाठवत आहात? असा सवाल त्यांनी केला.
अनिल परब हे सेवाभावी मंत्री आहेत. जमा करण्याचं आणि आणून द्यायचं काहीही कमिशन न घेता. म्हणून त्यांची चौकशी करावी. सेवा आणि मेवा कसा जमा केला, कुठून नेऊन पोहोचवला याची चौकशी झाली पाहिजे, असं ते म्हणाले. दीड हजार घ्या, पाचशे घ्या. शंभर घेऊन जा. हे काय आहे. चेष्टा आहे लोकांची. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री असा असू शकतो, रडत लक्ष्मी अशी टीकाही त्यांनी केली. सचिन वाझेच्या लेटर बॉम्ब प्रकरणी अनिल परब यांची चौकशी केली जाण्याची शक्यता आहे. वाझेच्या पत्रानंतर आपण स्वत: चौकशीला तयार आहोत, असं अनिल परब यांनी पत्रकार परिषद घेत जाहीर केलं. मात्र, नारायण राणे यांनी अनिल परब यांच्याविषयी भविष्यवाणी केली. अनिल परब यांना NIA तपासासाठी घेऊन जाईल. एनआयएकडून फक्त राज्यपालांची परवानगी घेतली जाईल. अनिल परब चौकशीला तयार नसतील तर ते त्यांना उचलून नेतील, असं विधान राणे यांनी केलं आहे. त्यामुळे देशमुख यांच्यापाठोपाठ परब यांचीही चौकशी होणार का?, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
राज्य आहे, राज्याला स्वत:साठी लागणारा पैसा निर्माण करण्याचा अधिकार घटनेने दिलाय. त्यामुळे जरा संविधान वाचा. मातोश्रीच्या पिंजऱ्यात बसून काय राहता?, असा सवाल करतानाच माणसं मरत आहेत. 60 हजार लोकं मेलं आहेत. राज्य दिवाळखोरीकडे जात आहे. दीड हजार रुपये जाहीर करण्याचं काम क्लार्कचं आहे. मुख्यमंत्री म्हणून तुम्ही काय देता? असा सवालही त्यांनी दिला.
राज्याचे अन्न व औषधी प्रशासनमंत्री राजेंद्र शिंगणे जे सांगत आहेत ते नाचता येईना अंगण वाकडं आहे. रुग्णांच्या संख्येचा अंदाज घेता येत नाही का? अनेक देशात कोरोना थांबला आणि पुन्हा वाढला. त्यामुळे त्यांनी उपाययोजना केली. आज लंडनमध्ये सर्व सुरू आहे. शिंगणे काय सागंत आहे. मुख्यमंत्र्यांनी बोलावं. त्यांनी मंत्र्यांना बळी देऊ नये, अशी टाकी त्यांनी केली. तीन किलो गहू आणि दोन किलो तांदूळ किती जणांना पुरणार? पिंपात घालून वरून पाणी पिणार का? ही जनतेची चेष्टा आहे, असं सांगतानाच किती दिवस दुकाने बंद ठेवणार आहात? असा सवालही त्यांनी केला.
सचिन वाझे प्रकरणावरुन देखील राणेंनी जोरदार हल्लाबोल केला. राज्यात कायदा व्यवस्था नाही आहे. सचिन वाझे एक आहेत. नजरेआड असलेले सचिन वाझे किती आहेत? यांना नको असलेली माणसं सचिन वाझे सारख्या माणसाकडून मारुन टाकण्याचं काम अजून चालू आहे, असा गंभीर आरोप राणेंनी केला. NIA च्या चौकशीतू कोणाची आणि कोणाच्या सांगण्यावरुन हत्या करणार होते बाहेर पडेल, असं देखील राणे म्हणाले. कोरोना रोखण्यासाठी सर्व आरोग्य यंत्रणा त्वरित उपलब्ध करा, लॉकडाऊन उठवा, दुकानं खुली करा, अशी मागणी राणेंनी केली. कोरोना हातळण्यासाठी सरकारकडे बुद्धीमत्ता योग्य मार्गदर्शन नाही, अशी टीका राणेंनी सरकारवर केली. मुख्यमंत्री फक्त बाधितांचे, मृतांचे आकडे जाहीर करतात. ज्या सोयी अपुऱअया आहेत त्या उपलब्ध करा. रुग्णांना हॉस्पिटलमध्ये न्यायला अँबुलन्स नाही आहे. त्यासाठी वाझेची गाडी मातोश्रीहून मागवणार का? असं टीकास्त्र राणेंनी डागलं.




