कोरोना रुग्णवाढीची चिंता कायम; राज्यात दिवसभरात ६० हजारांवर रुग्ण

मुंबई : राज्यात कोरोनाची स्थिती अत्यंत विदारक बनत चालली आहे. राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी १५ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केलाय. अशावेळी गेल्या २४ तासांतील रुग्णांची वाढ चिंताजनक बनली आहे. राज्यात मंगळवारी दिवसभरात ६० हजार २१२ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर २८१ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. दिवसभरात रुग्ण बरे होण्याचं प्रमाणही घटलं असून, दिवसभरात ३१ हजार ६२४ रुग्ण पूर्णपणे कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.
नव्या आकडेवारीचा विचार केला तर राज्यातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या आता ३५ लाख १९ हजार २०८ वर पोहोचलीय. त्यातील २८ लाख ६६ हजार ९७ रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत. आतापर्यंत ५८ हजार ५२६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. राज्यात सध्या ५ लाख ९३ हजार ४२ रुग्णांवर उपचार सुरु असल्याची माहिती आरोग्य विभागानं दिली आहे.
मुंबईत दिवसभरात ७,८९८ नवे कोरोना रुग्ण
मंगळवारच्या आकडेवारीनुसार राज्यातील स्थिती चिंताजनक बनली असली तरी मुंबईला मात्र दिलासा मिळाल्याचं पाहायला मिळत आहे. मुंबईत दिवसभरात ११ हजार २६३ रुग्ण पूर्णपणे बरे होऊन घरी परतले आहेत. तर ७ हजार ८९८ जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. मुंबईत गेल्या २४ तासांत २६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. मृतांपैकी १५ जणांना काही दीर्घकालीन आजार होते.
मुंबई जिल्ह्यातील बरे झालेल्या रुग्णांचा दर ८१ टक्क्यांवर पोहोचला आहे. ६ एप्रिल ते १२ एप्रिलपर्यंत मुंबईतील एकूण कोविड वाढीचा दर १.७९ टक्के आहे. मुंबईतील रुग्ण दुपटीचा कालावधी ३८ दिवसांवर आलाय.
पुण्यात ५,३१३ नवे कोरोना रुग्ण
पुणे शहरात मंगळवारी दिवसभरात ५ हजार ३१३ कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे. तर दिवसभरात ४ हजार ५७३ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. पुण्यातील आजची मृतांची आकडेवारी अत्यंत चिंताजनक बनली आहे. पुण्यात गेल्या २४ तासांत ७३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय.




