शिक्षण

बोर्ड परीक्षेला मुकल्यास जूनमध्ये विशेष परीक्षा

मुंबई : शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दहावी-बारावीच्या परीक्षा ऑफलाईन (लेखी परीक्षा) पद्धतीनुसारच होणार असल्याची माहिती दिली होती. यानंतर विद्यार्थ्यांसमोर अनेक प्रश्न उभे ठाकले होते. त्यामुळे कोरोनामुळे १० वी आणि १२ वीच्या ज्या विद्यार्थ्यांना ठरलेल्या तारखेला परीक्षा देता येणार नाही, त्यांच्यासाठी जूनमध्ये विशेष परीक्षा घेण्यात येणार आहे, असे शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले.

दरम्यान, संबंधित विद्यार्थी कोरोनाबाधित असेल, विद्यार्थ्यांच्या घरात, परिसरात कोरोना रुग्ण असतील आणि तो राहात असलेला भाग सील केला असेल, तर अशा विद्यार्थ्यांना दहावी आणि बारावीची परीक्षा देता येणार नाही. त्यांच्यासाठी जूनमध्ये विशेष परीक्षा घेतली जाणार आहे. आताच्या परीक्षेला विद्यार्थी आला नाही, तर संबंधित शाळांनी त्या विद्यार्थ्यांची माहिती शिक्षण मंडळाला द्यायची आहे. यामुळे या विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाणार नाही आणि विद्यार्थ्यांना जूनमध्ये परीक्षा देता येईल.

दहावी आणि बारावीच्या परीक्षांबाबत गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा आहे. राज्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. अशा परिस्थितीत या परीक्षा ऑनलाईन व्हाव्या, अशी अनेक पालक आणि विद्यार्थ्यांची मागणी आहे. मात्र, परीक्षा ऑफलाईनच होणार असल्याचे शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी नुकतेच जाहीर केले होते. यामुळे, अनेकजण चिंतेत असताना आता यावरही मार्ग काढण्यात आला असून कोरोनामुळे जे विद्यार्थी परीक्षा देऊ शकणार नाहीत, त्यांची जूनमध्ये पुन्हा परीक्षा घेतली जाणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button