
ठाणे (प्रतिनिधी) : हवामान विभागाने (IMD) ठाणे जिल्ह्यासाठी ४ व ५ जुलै २०२६ रोजी ‘रेड अलर्ट’ जारी केला असून मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व अंगणवाड्या तसेच प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना शनिवार, दि. ४ जुलै रोजी ठाणे जिल्हा प्रशासनाने सुट्टी जाहीर केली आहे. नागरिकांनी देखील गरज नसल्यास घराबाहेर पडू नये असे आवाहन ठाणे महापालिका प्रशासनाने केले आहे. ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील सर्व शाळा बंद राहणार आहेत. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठाणे महानगरपालिकेने आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवली आहे. आपत्ती व्यवस्थापन कक्ष, अग्निशमन विभाग तसेच संबंधित विभागांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. नागरिकांनी देखील अत्यावश्यक काम नसल्यास घराबाहेर पडणे टाळावे, हवामान विभाग व प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे तसेच अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा, असे आवाहन ठाणे महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.




