छोटा शकीलचा मेव्हणा सलीम फ्रुट ईडीच्या ताब्यात

मुंबई : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम आणि महाराष्ट्रातील राजकीय नेत्यांमध्ये झालेल्या करारासंदर्भात झडती घेण्यासाठी ईडीच्या केंद्रीय विभागाचे पथक आज मुंबईत दाखल झाले. मुंबईतील विविध ठिकाणी ईडीचे पथक छापेमारी करत आहे. याप्रकरणात महाराष्ट्रात एका मोठ्या नेत्याचे नाव असल्याचे म्हटले जात आहे. मनी लॉड्रिंग प्रकरणी ईडी ही छापेमारी करत आहे. याबाबत अजूनपर्यंत ईडीचे अधिकृत वक्तव्य आले नाहीये. पण याप्रकरणात ईडीने छोटा शकीलचा मेव्हणा सलीम कुरेशी ऊर्फ सलीम फ्रुटला ताब्यात घेतले आहे. लवकरच ईडी याला अटक करण्याची शक्यता आहे.
दरम्यान काही वर्षांपूर्वी सलीम फ्रुटला एका प्रकरणात अटक करण्यात आली होती. त्यावेळी चौकशीदरम्यान तीन वर्षांत चीन, बँकॉक, सौदी अरेबिया, श्रीलंका आणि तुर्कस्तानसह जवळपास १७ ते १८ देशांमध्ये फिरला असल्याचे समोर आले होते. आज दाऊद इब्राहिमची बहीण हसीना पारकरच्या मुंबईतील निवासस्थानी सकाळी ईडीच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकला. हसीना पारकरच्या घरी तब्बल चार तास ईडीने छापेमारी केली, त्यानंतर आता ईडी पारकरच्या घराबाहेरून निघाली आहे.
९० च्या दशकात फरार झालेला अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमसंबंधित लोकं मनी लाँड्रिंगमध्ये सामील असल्याचा आरोप आहे. काही दिवसांपूर्वी केंद्रीय तपास एजेंसीला अंडरवर्ल्डचे पंजाब कनेक्शनबाबत माहिती मिळाली होती. पंजाबमध्ये अस्थिरता फैलावण्यासाठी पाकिस्तानी गुप्तचर एजेंसी आयएसआय अंडरवर्ल्डचा आधार घेत असल्याचे समोर आले होते. दरम्यान माहितीनुसार, अंडरवर्ल्डसंबंधित लोकं मोठ्या प्रमाणात मुंबईहून पंजाबला पैसे पोहोचवलत आहेत.




