मुंबईच्या कोस्टल रोड प्रकल्पातील बोगद्याचा २ किलोमीटर टप्पा पूर्ण

मुंबई : किनारी रस्ता प्रकल्प अर्थात कोस्टल रोड प्रकल्पाच्या पॅकेज ४ अंतर्गत प्रियदर्शिनी पार्क ते छोटा चौपाटी दरम्यान २.०७० किलोमीटर अंतराचा बोगदा दोन्ही बाजूने खोदण्यात येत आहे. यातील पहिल्या बोगद्याचा २ किलोमीटरचा टप्पा पूर्ण झाला आहे. उर्वरित ७० मीटर लांबीच्या बोगद्याचे काम येत्या ८ ते १० दिवसात पूर्ण होणे अपेक्षित आहे.
महानगरपालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल यांच्या अधिपत्याखाली व अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) श्रीमती आश्विनी भिडे यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई कोस्टल रोड प्रकल्पाचे काम वेगाने सुरु आहे. प्रकल्पाचे जवळपास ५० टक्के काम पूर्ण झाले आहे. संपूर्ण प्रकल्प डिसेंबर, २०२३ मध्ये पूर्ण होणे अपेक्षित आहे.
मुंबई कोस्टल रोड प्रकल्पातील पॅकेज ४ अंतर्गत मुख्यत्वे दोन्ही बाजूने वाहतुकीसाठी प्रत्येकी १ अशा एकूण २ बोगद्यांचे काम अंतर्भूत आहे. हे बोगदे प्रियदर्शिनी पार्क ते नेताजी सुभाष मार्गालगत (मरिन ड्राईव्ह) येथे असणाऱ्या ‘छोटा चौपाटी’पर्यंत बांधले जात आहेत. तसेच ते ‘मलबार हिल’ च्या खालून जाणार आहेत. या दोन्ही बोगद्यांसाठीचे खोदकाम हे जमिनीखाली १० मीटर ते ७० मीटर एवढ्या खोलीवर करण्यात येत आहे.
बोगदे बांधकाम अंतर्गत पहिला बोगदा खणन करण्याची सुरुवात दिनांक ११ जानेवारी २०२१ रोजी प्रियदर्शनी पार्क येथून करण्यात आली होती. सदर बोगद्याचा एक किलोमीटरचा टप्पा दिनांक ४ सप्टेंबर २०२१ रोजी पूर्ण झाला. तर २ किलोमीटरचा टप्पा दिनांक २९ डिसेंबर २०२१ रोजी पूर्ण झाला आहे. पहिल्या बोगद्यासाठी उर्वरित ७० मीटर खोदकाम बाकी असून ते येत्या १० दिवसांत पूर्ण होणे अपेक्षित आहे.
या दोन्ही बोगद्यांची लांबी ही प्रत्येकी २.०७० किलोमीटर एवढी आहे. दोन्ही बोगद्यांचा व्यास हा १२.१९ मीटर आहे. या बोगद्यांचे खोदकाम करताना आतल्या बाजूने वर्तुळाकृती पद्धतीने काँक्रिटचे अस्तरीकरण (Concrete Lining) केले जाते. त्यामुळे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर बोगद्याचा अंतर्गत व्यास हा प्रत्येकी ११ मीटर इतका असणार आहे. दोन्ही बोगदे हे दोन बाजूंच्या वाहतुकीसाठी अर्थात येणाऱया व जाणाऱया वाहतुकीसाठी स्वतंत्रपणे उपयोगात येतील. सुरक्षेची व प्रतिबंधात्मक उपायोजना म्हणून दोन्ही बोगद्यांना जोडणारे एकंदर ११ छेद बोगदे (Cross Tunnel / Cross Passages) देखील या बोगद्यांचा भाग असणार आहेत. सदर बोगद्यांसाठी आपत्कालीन नियत्रंण कक्ष असून त्यामध्ये स्वयंचलित यंत्रणादेखील कार्यान्वित करण्यात येणार आहे. सदर बोगद्यांमध्ये ‘सकार्डो’ ही वायूविजन प्रणाली लावली जाणार असून ती भारतामध्ये रस्ते बोगद्यांसाठी प्रथमच वापरली जाणार आहे.
या बोगद्यांचे खोदकाम बोगदा खणणारे संयंत्र (टीबीएम – टनेल बोअरींग मशिन) च्या सहाय्याने केले जात असून ते भारतातील सर्वात मोठ्या व्यासाचे टीबीएम संयंत्र आहे. या संयंत्राचे ‘मावळा’ असे नामकरण करण्यात आले आहे. हे संयंत्र देखील वैशिष्ट्यपूर्ण आहे. १२.१९ मीटर व्यास असणाऱया मावळा संयंत्राची उंची ४ मजली इमारती एवढी आहे. तर त्याची लांबी ही तब्बल ८० मीटर एवढी आहे. त्याचे वजन सुमारे २८०० टन इतके असून त्याबरोबर वापरण्यात येणाऱया स्लरी ट्रीटमेंट प्लांट (Slurry Treatment Plant) च्या यंत्रसामुग्रीचे वजन सुमारे ६०० टन आहे. ‘मावळा’ संयंत्राची पाती दर मिनिटाला साधारणपणे २.६ वेळा गोलाकार फिरु शकणारी आहेत.
‘मावळा’ संयंत्राचे वैशिष्ट्य म्हणजे ज्या ठिकाणी बोगदा खणावयाचा आहे, त्या ठिकाणी प्रथम ‘बेंटोनाईट’ (Bentonite) मिश्रित पाण्याचा अत्यंत वेगवान फवारा केला जातो. त्यानंतर संयंत्राच्या १२.१९ मीटर व्यास असणाऱया चकती प्रकारच्या पात्याद्वारे बोगदा खणला जातो. बोगदा खणल्यामुळे निघणारी माती, खडी इत्यादी ही आधी फवारलेल्या पाण्यामध्ये एकत्र होऊन खडी व माती मिश्रित पाणी (Slurry) तयार होते. हे पाणी ‘मावळा’ या संयंत्राद्वारे खेचून बाहेर टाकले जाते. ते पुन्हा प्रक्रिया करुन वापरले जाते. खोदकामातून निघणारे खडक व खडी यांचाही उपयोग भराव कामात करण्यात येतो.



