Top Newsराजकारण

भाजपनेच पुणेकरांवर पाणीकपात लादली; जयंत पाटलांचे फडणवीसांना जोरदार प्रत्युत्तर

पुणे : शहरात महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारण तापल्याचं पाहायला मिळत आहे. अशावेळी पाणीप्रश्नावर भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस आमनेसामने आल्याचं दिसतंय. शुक्रवारी पुण्यात बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांचं नाव न घेता पाण्याच्या मुद्द्यावरुन जोरदार टीका केली होती. ‘पुण्याचं पाणी पळवतील त्यांना पुणेकर पाणी पाजल्याशिवाय राहणार नाहीत’, अशा शब्दात फडणवीसांनी अजितदादांवर निशाणा साधला होता. त्यावर आत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी फडणवीसांना प्रत्युत्तर दिलं आहे.

पुण्याच्या पाणी कपातीबाबत महाराष्ट्र सरकारचा किंवा जलसंपदा विभागाचा कोणताही प्रस्ताव नाही. कोणताही विचार झालेला नाही. जे पत्र पालिकेला देण्यात आलंय. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना अशी ११ पत्रे देण्यात आली होती. त्यांनी १८० एमएलडी पाणी बंद केलं होतं. असं आमचं धोरण नाही. त्यांनी काल येऊन सांगितलं मात्र पाणी कपातही त्यांनीच केली होती. त्यांनाच पुणेकर धडा शिकवतील. १८०180 एमएलडी पाणी कपात पुणेकरांना सहन करावी लागली, अशा शब्दात जयंत पाटील यांनी फडणवीसांवर पलटवार केलाय.

पाण्याचा पुनर्वापर व्हावं अशी पत्रे दिली आहेत. वापरलेलं पाणी रिसायकलिंग होऊन नदीत सोडलं तर पुढच्या लोकांना फायदा होईल. विनाकारण त्यांनी पुणे शहरातील नागरिकांना भीती दाखवण्याचं काम केलं. निवडणुका आल्या की ते काहीतरी भीती दाखवतात, अशी खोचक टीकाही जयंत पाटील यांनी भाजपवर केलीय. तसंच महापालिकेत नव्यानं समाविष्ट झालेल्या ३४ गावांना पाणी कमी पडणार नाही. काही वळण बंधारे बांधून वाया जाणारं पाणी वळवण्याचा प्रयत्न करणार आहोत. आता कोणतीही कारवाई होणार नाही. कोणतीही पाणीकपात होणार नाही, असं पाटील यांनी स्पष्ट केलं आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button