
मुंबई : मयांक अग्रवालचे दीडशतक आणि अक्षर पटेलच्या अर्धशतकी खेळीवर न्यूझीलंडचा गोलंदाज एजाझ पटेल यानं पाणी फिरवलं. जिम लेकर व अनिल कुंबळे यांच्यानंतर कसोटीत एका डावात १० विकेट्स घेणारा तो तिसरा गोलंदाज ठरला. इंग्लंडच्या जिम लेकर यांनी १९५६मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध मँचेस्टर कसोटीत एका डावात १० विकेट्स घेतल्या होत्या. त्यानंतर भारताच्या अनिल कुंबळेनं १९९९मध्ये पाकिस्तानविरुद्ध १० विकेट्स घेण्याचा पराक्रम केला होता. कालच्या ४ बाद २२१ वरुन पुढे खेळणाऱ्या भारतीय संघाला एकट्या एजाझ पटेलने लोळवलं. काल मयंक अग्रवाल १२० धावांवर नाबाद होता त्याने आज ३० धावांचं योगदान दिलं. मयंक १५० धावांवर असताना एजाझचा बळी ठरला. आज अक्षर पटेलने अर्धशतकी खेळी करत अखेरच्या षटकांमध्ये भारताला ३०० पार नेलं. मात्र त्यालादेखील एजाझनेच पायचित केलं. दरम्यान, भारताचा डाव ३२५ धावांवर संपुष्टात आला आहे. मयंक आणि अक्षरव्यतिरिक्त कोणत्याही भारतीय फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही.
मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याचा आज दुसरा दिवस आहे. पहिल्या दिवशी पावसामुळे सामन्यात व्यत्यय आला त्यामुळे पहिले सत्र खेळवता आले नाही त्यानंतर भारताने पहिल्या दिवसअखेर ४ विकेट गमावत २२१ धावा केल्या होत्या. काल सलामीवीर शुभमन गिलने ४४ धावांचं योगदान दिलं होतं. दरम्यान, भारताचे ३ फलंदाज भोपळ्यावर परतले आहेत. त्यामध्ये चेतेश्वर पुजारा, विराट कोहली आणि रवीचंद्रन अश्विन या तिघांचा समावेश आहे.
मयांक अग्रवाल व शुभमन गिल यांच्या फटकेबाजीच्या जोरावर टीम इंडियानं पहिल्या दिवशी वर्चस्व गाजवले. मयांक व शुभमन गिल यांनी टीम इंडियाला ८० धावांची भागीदारी उभारून दिली, परंतु ३ फलंदाज पटापट माघारी परतले. गिल ७१ चेंडूंत ७ चौकार व १ षटकारासह ४४ धावांवर झेलबाद झाला. चेतेश्वर पुजारा पुन्हा अपयशी ठरला. कर्णधार विराट कोहलीला चूकीच्या निर्णयाचा फटका बसला. पण, मयांकनं श्रेयस अय्यर व वृद्धीमान सहा यांच्यासह टीम इंडियाचा डाव सावरला पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताच्या ४ बाद २२१ धावा झाल्या होत्या. दुसऱ्या दिवसाच्या पहिल्याच षटकात एजाझ पटेलनं सहाला ( २७) पायचीत केलं अन् पुढच्याच चेंडूवर आर अश्विनला अप्रतिम चेंडूवर त्रिफळाचीत केलं. घेतल्यानंतर किवी खेळाडू जल्लोष करत असताना अश्विन डीआरएसची मागणी करताना दिसला. आपण नेमकं कसं बाद झालोय, हेच त्याला कळेनासे झाले होते. अक्षर पटेलनं किवी गोलंदाज पटेलची हॅटट्रिक मात्र हुकवली. अक्षर व मयांक यांनी सातव्या विकेटसाठी दमदार खेळ केला. ही जोडी तोडण्यासाठी टीम साऊदी, कायले जेमिन्सन, विलियम सोमरविले या सर्वांनी प्रयत्न केले, परंतु अखेर यश एजाझ पटेललाच मिळाले. त्यानं लंच ब्रेकनंतर पटेलनं मोठी विकेट घेतली. मयांक ३११ चेंडूंत १७ चौकार व ४ षटकारांसह १५० धावांवर माघारी परतला. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत सर्वाधिक तीनवेळा १५०+ धावा करण्याचा रोहित शर्माच्या विक्रमाशी मयांकनं बरोबरी केली.
प्रतिस्पर्धीच्या घरच्या मैदानावर आघाडीच्या सात फलंदाजाला एकाच गोलंदाजानं बाद करण्याची ही दुसरी वेळ ठरली. याआधी २००२मध्ये मुथय्या मुरलीधरन यानं झिम्बाब्वेविरुद्ध असा पराक्रम केला होता. अक्षरनं आक्रमक खेळ सुरू करताना सोमरविलेला ४,६,३ असे चोपले. अक्षरनं ११३ चेंडूंत कसोटीतील पहिले अर्धशतक पूर्ण केले. पण, एजाझनं पुन्हा खोडा घातला, अक्षरला ५२ धावांवर पायचीत करून ८वी विकेटही नावावर केली. न्यूझीलंडकडून कसोटी क्रिकेटमधील ही दुसरी सर्वोत्तम गोलंदाजी ठरली. यापूर्वी १९८५मध्ये रिचर्ड हेडली यांनी ब्रिस्बेन कसोटीत ५२ धावांत ९ विकेट्स घेतल्या होत्या. किवीच्या एकाही गोलंदाजाला आजपर्यंत ७ पेक्षा अधिक विकेट घेता आल्या नाही. एजाझनं तोही पराक्रम करून दाखवला. भारताविरुद्ध न्यूझीलंडच्या गोलंदाजाची ही सर्वोत्तम कामगिरी ठरली. एजाझनं ९वी विकेटही नावावर केली. एजाझनं १० विकेट्स घेताना ऐतिहासिक कामगिरी केली. भारताचा पहिला डाव ३२५ धावांवर गुंडाळला.
एजाझचा मुंबईत जन्म, न्यूझीलंडकडून भारताविरुद्ध मैदानात
एजाझला मुंबईबद्दल एक वेगळीच ओढ असल्याचे दिसते. त्यांचा जन्मही याच शहरात झाला आहे. एजाझचा जन्म २१ ऑक्टोबर १९८८ रोजी मुंबईतच झाला होता. तो आठ वर्षांचां असताना त्याचे कुटुंब न्यूझीलंडला जाऊन स्थायिक झाले होते आणि तेव्हापासून ते या देशातील रहिवासी आहेत. आता भारताला त्याच्या जन्मभूमीवर हरवण्याचा निर्धार त्याने केला आहे, असे दिसतेय. एजाझच्या कारकिर्दीतील आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्याला न्यूझीलंडमध्ये विकेट्सचं खातंदेखील उघडता आलेलं नाही. न्यूझीलंडमध्ये हा खेळाडू आतापर्यंत तीन सामने खेळला असून तीनही सामन्यांमध्ये त्याला विकेट घेता आलेली नाही. मात्र देशाबाहेर त्याने त्याचा जलवा दाखवला आहे. एजाझ उपखंडात खूप यशस्वी गोलंदाज ठरला आहे.




