Top Newsराजकारण

ममतांचा काँग्रेसला विरोध, तर शरद पवारांनीही राहुल गांधींचे नेतृत्व नाकारले !

मैदानात उतरून लढ़णाऱ्यानेच भाजप विरोधकांचे नेतृत्व करावे; पवारांचे ममतांना समर्थन

मुंबई : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बुधवारी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची सिल्व्हर ओकवर भेट घेतली. यावेळी ममता यांनी पत्रकारांना राहुल गांधी यांचे नाव न घेता सणसणीत टोला हाणला. आश्चर्याची बाब म्हणजे शरद पवार यांनीदेखील ममता यांच्या म्हणण्याला खास शैलीत पाठिंबा दर्शविला.

ममता बॅनर्जी यांनी राहुल गांधी यांचे नाव न घेता कोणताही व्यक्ती काही करत नाही आणि परदेशात जाऊन बसतो, तर काम कसे चालेल? असा सवाल केला. ममता बॅनर्जींच्या या विधानावर शरद पवार म्हणाले की, तुम्ही फिल्डवर राहिला नाही तर भाजपा तुम्हाला बोल्ड करेल. जर तुम्ही फिल्डवर राहिलात तरच भाजपा हरेल. जो लढाई लढेल त्यालाच नेतृत्व करायला द्यायला हवे. उद्धव ठाकरेंना बरे नसल्याने ते ममता यांना भेटू शकले नाहीत. संजय राऊत, आदित्य ठाकरे यांनी त्यांची भेट घेतली. ममता बोलल्या ते योग्यच आहे, फिल्डवर राहूनच त्या विजयी झाल्या आहेत, असे म्हणत शरद पवार यांनी अप्रत्यक्षपणे काँग्रेस नेते राहुल गांधी यांना विरोधकांचे नेतृत्व नको अशी बाजू घेतली आहे.

पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्र जुने नाते आहे. भाजपविरोधात जे एकत्र येतील त्या पक्षांचे स्वागत असेल. भाजपला देशात सक्षम पर्याय तयार करण्याची आवश्यकता आहे. राष्ट्रीय स्तरावर एकसारखा विचार करणाऱ्यांनी एकत्र येण्याची गरज आहे. सगळ्यांनी मिळून भाजपला सक्षम पर्याय उपलब्ध करून दिला पाहिजे. २०२४ च्या निवडणुकीत हा पर्याय उपलब्ध हवा. त्यासाठीच आमची भेट झाल्याचं शरद पवारांनी स्पष्ट केले.

काँग्रेसला वगळण्याचा प्रश्न नाही

भाजपविरोधी पक्षांनी एकत्र येत पर्याय उपलब्ध करुन द्यायला हवा. त्यामुळे काँग्रेस आणि इतर पक्षांना वगळण्याचा प्रश्नच नाही. नेतृत्व आमच्यासाठी महत्त्वाचा मुद्दा नाही. सध्या सक्षम पर्याय उपलब्ध करावा. कुणाला वगळण्याचा प्रश्न नाही. सगळ्यांना सोबत घेऊन पुढे जायचं आहे. ज्याची मेहनत करायची तयारी आहे. त्यांना सोबत घेऊन पुढे जावं असंही शरद पवारांनी नमूद केले.

यूपीए आहे कुठे?; ममतांचा पवारांसमोरच प्रश्न

पवार आणि ममतादीदींनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांना यूपीए संदर्भात प्रश्न विचारला गेला. त्यावर कुठे आहे यूपीए? आहे कुठे यूपीए? असा उरफाटा सवाल ममता बॅनर्जींनी करून सर्वांना धक्का दिला. ममतादीदींनी थेट यूपीएचं असित्वच नाकारलं. त्यामुळे ममतादीदींना काँग्रेसच्याच नेतृत्वाला आव्हान दिल्याची जोरदार चर्चा सुरू आहे.

मी मुंबईत शरद पवार आणि उद्धव ठकारेंना भेटण्यासाठी आले होते. उद्धव ठाकरेंची तब्येत बरी नसल्याने त्यांना भेटता आले नाही. त्यांची तब्येत बरी व्हावी ही प्रार्थना करते. उद्धव ठाकरेंऐवजी शिवसेना नेते संजय राऊत आणि आदित्य ठाकरेंशी माझी चर्चा झाली, असं त्या म्हणाल्या. आज देशात फॅसिझम सुरू आहे. त्या विरोधात एक सक्षम पर्यायी फोर्स असायला हवी. एकटा कोणी हे काम करू शकत नाही. जे स्ट्राँग नेते आहेत त्यांना हे करावं लागेल. शरद पवार हे सर्वात ज्येष्ठ नेते आहेत. आम्ही त्यांच्यासोबत अनेक वर्षे काम केलं आहे. त्यामुळे राजकीय चर्चा करण्यासाठी मी पवारांकडे आले आहे, असं त्या म्हणाल्या. तसेच पवारांनी जे काही सांगितलं त्याच्याशी आम्ही सहमत आहोत, असंही त्या म्हणाल्या.

काँग्रेस लढतच नाही त्याला काय करणार?

एक स्ट्राँग पर्याय असला पाहिजे. लढणारा पर्याय पाहिजे. जो लढतच नाही त्याला आम्ही काय करणार? सर्वांनी लढावं अशी आमची इच्छा आहे, अशा शब्दात ममता बॅनर्जी यांनी काँग्रेसला टोला लगावला.

https://twitter.com/AITCofficial/status/1465975784418340870

तृणमूल काँग्रेस महाराष्ट्रात निवडणुका लढवणार नाही

पश्चिम बंगालच्या निवडणुकीत ममता बॅनर्जी यांनी भाजपाला धूळ चारली. अगदी पंतप्रधानांपासून भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी बंगालची निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. मात्र त्याठिकाणी भाजपाला पराभव पत्करावा लागला. त्यानंतर ममता बॅनर्जी यांनी आता राष्ट्रीय स्तरावर मोर्चा उघडला आहे. गोवा, त्रिपुरा, मेघालय यासारख्या राज्यात ममता बॅनर्जी यांच्या टीएमसीने शिरकाव केला आहे. या राज्यातील प्रमुख नेते टीएमसीत प्रवेश करत असल्याने ममता बॅनर्जींच्या राष्ट्रीय राजकारणाच्या दिशेने जोरदार पाऊल टाकण्याचे संकेत मिळत आहेत.

त्यातच ममता बॅनर्जी या मुंबई दौऱ्यावर आल्याने महाराष्ट्रातही तृणमूल काँग्रेसचा शिरकाव होणार का? असा प्रश्न सगळीकडून विचारला जात होता. त्यावर ममता बॅनर्जींनीही प्रतिक्रिया दिली आहे. महाराष्ट्रात मी येत नाही असं ममता बॅनर्जी यांनी स्पष्ट सांगितले आहे. त्यामागे कारण दिलंय की, जिथं जिथं प्रादेशिक पक्ष चांगले काम करत आहेत तिथं टीएमसी जाणार नाही. ज्याठिकाणी भाजपविरोधात ताकदीची गरज आहे तिथे आम्ही त्या ताकदीसोबत उभं राहणार आहोत. प्रादेशिक पक्षांना साथ देणार असल्याचं ममता बॅनर्जी यांनी सांगितले आहे.

परदेशात राहून राजकारण अशक्य; ममतांचा राहुल गांधींना टोला

ममता बॅनर्जी यांनी वाय. बी. चव्हाण सेंटरमध्ये अनेकविध क्षेत्रातील मान्यवरांशी संवाद साधला. यावेळी ममता बॅनर्जी यांनी काँग्रेस आणि राहुल गांधींवर टीका केली. परदेशात राहून राजकारण करता येत नाही. रस्त्यावर उतरला नाही, तर भाजप तुम्हाला क्लीन बोल्ड करेल, असा टोला लगावला.

तुम्ही काँग्रेसच्या विरोधात का लढत आहात, असा प्रश्न उपस्थितांपैकी एकाने विचारला. यावर बोलताना ममता बॅनर्जी म्हणाल्या की, काँग्रेस आणि डावे पक्ष आमच्याविरोधात बंगालमध्ये लढले. त्यामुळे आता आम्हीही काँग्रेसविरोधात कंबर कसली आहे. भाजपला पराभूत करण्यासाठी आपल्याला हा लढा द्यावाच लागेल, असे ममता बॅनर्जी यांनी सांगितले.

भाजपचा पराभव सहज शक्य आहे

या कार्यक्रमात बोलताना ममता बॅनर्जी राजकीय मुद्द्यांवर बोलताना भाजपच्या पराभवाचा फॉर्म्युला सांगत भाजपविरोधी आघाडीचेही अप्रत्यक्षपणे संकेत दिल्याचे सांगितले जात आहे. देशात भाजपला पराभूत करायचे असेल, तर प्रादेशिक पक्षांनी एकत्र येणे आवश्यक आहे. सर्व प्रादेशिक पक्ष एकत्र आले, तर राष्ट्रीय पातळीवर भाजपला पराभूत करणे सहज शक्य आहे, असा दावा ममता बॅनर्जी यांनी यावेळी बोलताना केला.

दरम्यान, तुम्ही सातत्याने मैदानात उतरून भाजपसोबत लढत राहायला हवे. नाहीतर ते तुम्हाला बाहेर ढकलून देतील. पश्चिम बंगालमध्ये सर्व काही सुरळीत सुरू असतानाही मला बाहेर पडावे लागले. जेणेकरून इतरही प्रादेशिक पक्ष बाहेर पडतील आणि राजकारणात स्पर्धा तयार होईल, असे ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे.

शाहरुख खानचा राजकीय बळी

शाहरुख खानचा राजकीय बळी देण्यात आला, असा मोठा आरोप करत, भाजप हा क्रूर आणि अलोकतांत्रिक पक्ष असल्याची बोचरी टीकाही ममता बॅनर्जी यांनी केली. याशिवाय, चित्रपट दिग्दर्शक महेश भट तुम्हाला लक्ष्य करण्यात आले होते, शाहरुख खानलाही त्रास देण्यात आला. जर आपल्याला जिंकायचे असेल तर आपल्याला लढले आणि बोलले पाहिजे. तुम्ही आम्हाला राजकीय पक्ष म्हणून मार्गदर्शन करा आणि सल्ला द्या, असे आवाहन ममता बॅनर्जी यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button