कोरोना काळात मुख्यमंत्री पैसे मोजण्यात व्यस्त म्हणून मानेचा त्रास; किरीट सोमय्यांची मुख्यमंत्र्यांवर टीका

बुलडाणा : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मान आणि मणक्याचा त्रास सुरु झाल्याने त्यांच्यावर छोटीशी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून, लवकरच ते कामावर रुजू होतील अशी माहिती शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. अशावेळी भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्र्यांवर खोचक टीका केलीय. मुख्यमंत्री कोरोना काळात पैसे मोजण्यात व्यस्त होते, असा घणाघात सोमय्या यांनी केलाय.
कोरोना काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पैसे मोजण्यात, बायकोचा बंगला वाचवण्यात व्यस्त होते. मिलिंद नार्वेकर यांचा बंगला वाचवण्यात व्यस्त होते. अनिल परब यांच्या बांधकामात व्यस्त होते, अशा अनेक कामात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व्यस्त होते, अशी खोचक टीका सोमय्या यांनी केलीय. ठाकरे सरकारने लुटीच्या साम्राज्याची स्थिती उभी केलीय. तर अजित पावरांचे मेहुणे आणि मामाला ईडीचे निमंत्रण आलं असल्याचा टोलाही त्यांनी लगावलाय.
येत्या ३१ डिसेंबरपर्यंत ठाकरे सरकारमधील ४० मंत्र्यांचे घोटाळे बाहेर काढून महाराष्ट्र भ्रष्टाचारमुक्त करण्याचा आमचा संकल्प आहे. तर अजित पवार यांच्यावर आयकर विभागाने टाकलेल्या धाडीत त्यांचे मामा आणि मेहुणे यांना ईडीचे निमंत्रण आले आहे. येत्या ३१ डिसेंबरपर्यंत ठाकरे सरकारमधील ४० मंत्र्यांचे घोटाळे बाहेर काढून महाराष्ट्र भ्रष्टाचार मुक्त करण्याचा संकल्प आमचा आहे, असा इशाराही सोमय्या यांनी दिलाय.
सोमय्या यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली असली तरी त्यांची प्रकृती चांगली व्हावी यासाठी प्रार्थना करतो. नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राने करावी असंही किरीट सोमय्या म्हणाले.
राज्यातील एसटी कर्मचारी संपावर आहेत. त्यावर तोडगा निघालेला नाही. असं असलं तरी सरकारमधील मंत्री फक्त वसुलीमध्ये व्यस्त असल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केलाय. तसंच कर्मचाऱ्यांना पगार मिळत नाही म्हणून ते आत्महत्या करत आहेत. त्यांनी आंदोलन केलं तर त्यांना जेलमध्ये टाकलं जात आहे. राज्य सरकारनं एसटी कर्मचारी संपावर तोडगा काढला पाहिजे, असं आवाहन सोमय्या यांनी केलंय.
सोमय्यांकडून बुलडाणा अर्बन बँकेला क्लीन चिट?
सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या नांदेड जिल्ह्यातील ४ साखर कारखान्यांना कर्ज दिल्याप्रकरणी आयकर विभागाने बुलडाणा अर्बन बँकेवर धाड टाकून खळबळ उडवून दिलीय होती. बँकेतील १२०० खाती बनावट असल्याचे सांगून ५४54 कोटी रुपयांचा हिशेब लागत नसल्याचं सांगत, ती खाती होल्ड ठेवली आहेत, असा आरोप करत सोमय्या आज बुलडाण्यात आले होते. सोमय्या यांनी बँकेत जाऊन अध्यक्ष राधेशाम चांडक यांची भेट घेत सर्व माहिती घेतली. तसंच बँक आयकर विभागालाही सहकार्य करेल असं बँकेकडून सांगण्यात आल्याचं सोमय्या म्हणाले.




