
नाशिक : नाशिकमध्ये हत्येचे सत्र सुरू आहे. सातपूर भाजप मंडल अध्यक्ष अमोल इघे यांचा आज, शुक्रवारी सकाळी खून करण्यात आला. युनियनच्या वादातून ही हत्या झाल्याचे सांगितले जाते आहे. या घटनेमुळे नाशिक शहरात खळबळ उडाली असून अवघ्या आठवडाभरात हा तिसरा खून आहे.
सातपूर परिसरातील भाजप मंडल अध्यक्ष अमोल इघे हे शुक्रवारी सकाळी कामगार युनियनच्या कामासाठी सातपूर औद्योगिक वसाहतीत असलेल्या कंपनीत गेले होते. गेल्या काही दिवसापासून या कंपनीत युनियन स्थापनेवरून दोन युनियनमध्ये वाद सुरू आहेत. इघे यांनी युनियन स्थापन करण्यास दुसऱ्या युनियनच्या प्रमुखासह काही कामगारांचा विरोध होता. यावर तोडगा काढण्यासाठी इघे आज सकाळी कंपनीत गेले होते. यावेळी वाद होऊन त्यांच्यावर सशस्त्र वार करण्यात आले. त्यात गंभीर जखमी झालेल्या ईघे यांना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. पण उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. अत्यंत मनमिळाऊ स्वभावामुळे इघे सर्वांना परिचित होते. अनेकदा पक्षभेद विसरून कार्यकर्त्यांना आणि नागरिकांना मदत करत. त्यांच्या हत्येमुळे त्यांच्या कुटुंबासह परिचितांना मोठा धक्का बसलाय.
मंडल अध्यक्ष अमोल इघे यांचा खून झाल्यानंतर नाशिक भाजपने आक्रमक भूमिका घेतली आहे. सातपूर पोलीस ठाण्याबाहेर भाजप कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन केले. भाजप आमदार राहुल ढिकले,सीमा हिरे आणि शहराध्यक्ष गिरीश पालवे यांच्यासह पदाधिकारी ठिय्या आंदोलनात सहभागी झाले. अमोल इघे यांचा मृतदेह ताब्यात घेण्यास भाजप पदाधिकाऱ्यांनी नकार देत पालकमंत्री छगन भुजबळ आणि पोलीस आयुक्त दीपक पांडे यांना हटविण्याची मागणी भाजपकडून करण्यात येत आहे. यावेळी समर्थकांची पोलिसांसोबत शाब्दिक चकमकही उडाली. भाजप नेत्यांची पोलिसांकडून धरपकड करण्यात आली.
संशयित आरोपी राष्ट्रवादीचा पदाधिकारी !
अमोल इघेंची हत्या करणारा संशयित आरोपी हा राष्ट्रवादीचा पदाधिकारी असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. राजकीय युनियनच्या वादातून ही हत्या झाल्याचा पोलिसांना संशय आहे. संशयित आरोपी हा राष्ट्रवादीच्या कामगार वंचित आघाडीचा पदाधिकारी असल्याचं बोललं जातं. त्याने महिन्याभरापूर्वी भाजपमधून राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. नाशिकचे पालकमंत्री आणि राष्ट्रवादीचे दिग्गज नेते छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाल्याचीही माहिती आहे.
अवघ्या चार दिवसात नाशिकमधील हत्येची ही तिसरी घटना धडल्याचं समोर आलं आहे. नाशिक महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर गुन्हेगारीवर आळा घालण्याचं मोठं आव्हान पोलिसांसमोर आहे.




