
मुंबई : शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांची आज नववी पुण्यतिथी. ‘सामना’चा आजचा अग्रलेख हा याच विषयाशी संबंधीत आहे. बाळासाहेब आज असते तर त्यांनी काय केलं असतं याचा ऊहापोह अग्रलेखात करण्यात आला आहे. त्याच अनुषंगानं विरोधक तसच स्वातंत्र्य भीकेत मिळालं म्हणणाऱ्यांवर अक्षरश: शब्दांचा चाबूक चालवलाय. अमरावतीच्या दंगलीपासून ते गुजरात दंगल आणि त्यातून हिंदुत्व नेमकं कोणतं खरं हे ठासून सांगण्याचा प्रयत्न केला गेलाय.
‘सामना’च्या अग्रलेखात म्हटले आहे की, महाराष्ट्र मजबूत राहिला तर देशाचा डोलारा भक्कम राहील हेच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे धोरण होते. त्याच धोरणाचे तोरण ते बांधत राहिले. हिंदू राष्ट्राची कल्पना त्यांनी मांडली, पण त्यांनी हिंदूंना सर्वधर्मसमभावाची शिकवण दिली. मातृभूमीला वंदन करणारा, प्रत्येक धर्मीय आपला, देशाचा असे ठासून सांगितले. विस्कळीत विचारांचे हिंदुत्व एका अवाढव्य ढिगाऱ्याप्रमाणे पडले होते. त्या अवाढव्य ढिगाऱ्याला शिवसेनाप्रमुखांनी एका वास्तूचे रुप दिले. त्या वास्तूत शिरलेले नेभळट आज शिवसेनेवर, हिंदुत्वावर लेक्चर देतात. तेव्हा लोक म्हणतात, आज बाळासाहेब हवेच होते.
अभिनेत्री कंगना रणौतने स्वातंत्र्य हे भीकेत मिळाल्याचं वक्तव्य केलं होतं. त्या वक्तव्यावर वाद उठलेला असतानाच अभिनेते विक्रम गोखले यांनी त्याचं समर्थन केलं. अवधूत गुप्तेसारखे गायकही अप्रत्यक्षपणे गोखलेंच्या बाजूनं उभे राहिले. ह्या सर्वांचा समाचार घेताना अग्रलेख म्हणतो- स्वातंत्र्याची नवी व्यवस्था, नवी व्याख्या, नवा इतिहास रचला जात आहे. १९४७ साली मिळालेले स्वातंत्र्य हे भीक आहे. खऱे स्वातंत्र्य २०१४ साली मिळाल्याचा साक्षात्कार काही गांजाड्यांना झाला आहे. त्याच गांजाड्यांनी फेकलेल्या चिलमीच्या थोटकांचा झुरका मारुन महाराष्ट्रातील काही भिकारडे लोक, होय होय, १९४७ पर्यंतचा स्वातंत्र्यलढा, क्रांतिकारी हा बकवास आणि भिकाऱ्यांचे आंदोलन होते, असे त्याच तारेत बरळू लागले आहेत. लोकमान्य टिळकांपासून ते वीर सावरकरांपर्यंत, सरदार पटेलांपासून ते नेताजी सुभाषचंद्र बोसांपर्यंत , भगतसिंगांपासून ते चाफेकर बंधूंपर्यंत सगळ्यांना एकजात स्वातंत्र्यलढ्यातील भिकारी असे संबोधणाऱ्यांची गांजाची नशा बाळासाहेब ठाकरे यांनी एका दमात उतरवून त्यांना पाच फूट जमिनीत गाडले असते.
महाराष्ट्राच्या चार शहरात दंगल उसळली. अमरावतीत तर अजूनही संचारबंदी आहे. सामनाच्या अग्रलेखात त्याचाही समाचार घेण्यात आलाय. तो म्हणतो- त्रिपुरा राज्यात तथाकथित हिंदू संख्याकांनी आंदोलन केली. त्या आंदोलनामुळे मुंबईतील कुण्या एका रझा अकादमी नामक इस्लामी संघटनेच्या भावना दुखावल्या. या मौलवींनी महाराष्ट्र बंदचे आवाहन केले. त्या बंदचे पडसाद फक्त विदर्भातील अमरावती शहरात उमटले. हिंसाचार घडवण्यात आला. रझा अकादमी ही एक पत्रकबाज संघटना आहे. हिंसाचार घडवणे, दगडफेक करण्याइतके बळ यांच्यापाशी नाही. तरीही त्रिपुरातील घटनेवरुन महाराष्ट्रात बंदची हाक देणे हा प्रकार योग्य नाहीच. त्या बंदचा गैरफायदा घेऊन नकली हिंदुत्ववाद्यांनी अमरावती पेटवली. बाळासाहेब असते तर त्या फडतूस रझा अकादमीवाल्यांची बंदची पत्रके काढण्याची हिंमत झालीच नसती व विदर्भातील नकली हिंदुत्ववाद्यांचेही मुखवटे ओरबडून निघाले असते.




