
मुंबई : ईडी कोठडीत असलेले राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील खंडणीच्या आरोपांप्रकरणी आणखी पुरावे नाहीत असं प्रतिज्ञापत्र मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी चांदीवाल आयोगासमोर सादर केलं आहे. परमबीर सिंग यांनी प्रतिज्ञापत्र सादर केलं याची पुष्टी त्यांच्या वकिलांनी केली आहे.
परमबीर सिंग यांनी अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटी वसुलीचे आदेश दिल्याचा आरोप केला होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवत परमबीर यांनी देशमुख यांच्यावर खंडणी वसुलीचा आरोप केला होता. यानंतर या आरोपांची चौकशी करण्यासाठी निवृत्त न्यायमूर्ती कैलाश उत्तमचंद चांदिवाल यांच्या एकसदस्यीय चौकशी आयोगाची स्थापना केली होती. या आयोगाला परमबीर सिंग यांनी वकिलामार्फत प्रतिज्ञापत्र सादर केलं आहे. यामध्ये अनिल देशमुख यांच्याविरुद्ध आणखी कोणताही पुरावा माझ्याकडे नसल्याचे परमबीर सिंग यांनी नमूद केलं आहे. परमबीर सिंह यांच्या वकिलांनी या माहितीला दुजोरा दिला आहे. परमबीर यांनी हे प्रतिज्ञापत्र गेल्या सुनावणीच्यावेळी आयोगासमोर सादर केलं आहे, असंही या वकिलांनी सांगितलं. विशेष सरकारी वकील शिशिर हिरे यांनीही याबाबत महत्त्वाची माहिती दिली. परमबीर सिंग यांनी देशमुख यांच्याविरुद्ध जे पत्र लिहिलं आहे त्यापलीकडे कोणताही पुरावा देण्यास नकार दिला आहे, असं हिरे यांनी सांगितलं. परमबीर सिंग या प्रकरणात उलट तपासणीसही तयार नसल्याचे हिरे यांनी नमूद केलं.
दरम्यान, परमबीर सिंग यांना चौकशीला गैरहजर राहिल्याने चांदीवाल आयोगाने अनेकदा समन्स बजावलं आहे. तसंच, जामीनपात्र वॉरंट देखील बजावलं. मात्र, परमबीर हे अद्याप एकदाही चौकशी आयोगासमोर हजर झालेले नाहीत. आयोगाने सुनावणीला गैरहजर राहिल्याबद्दल आतापर्यंत तीनवेळा परमबीर सिंग यांना दंड ठोठावला आहे.




