
मुंबई : नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो अर्थात एनसीबीचे अधिकारी बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडेच्या घरी पोहोचले आहेत. ड्रग्स प्रकरणाच्या चौकशीसाठीचे समन्स देण्यासाठी एनसीबीचे अधिकारी अनन्या पांडे यांच्या घरी पोहोचले होते. अधिकाऱ्यांनी अनन्या पांडेच्या घरी जाऊन तिला हे समन्स दिले आहेत. असे बोलले जाते आहे की, ज्या बॉलिवूड अभिनेत्रीबद्दल आर्यन खानच्या ड्रग्स चॅटमध्ये बोलले जात होते, ती अनन्या पांडे होती. मात्र, अद्याप याची पुष्टी झालेली नाही. सध्या एनसीबीने अनन्या पांडेला आज दुपारी २ वाजता ड्रग्ज प्रकरणात चौकशीसाठी बोलावले आहे.
अनन्या पांडे सोबत, ड्रग्स चॅटमध्ये आर्यन खानची बहीण सुहाना खानचे नावही समोर आले आहे. अनन्या पांडेच्या घरून बाहेर आल्यानंतर एनसीबीची एक टीम शाहरुख खानच्या मन्नतच्या घरी पोहोचली, जिथे सर्च ऑपरेशन सुरू आहे. सर्च ऑपरेशनसाठी शाहरुख खानच्या घरी पोहोचलेल्या एनसीबी टीमचे अनेक फोटो समोर आले आहेत. एनसीबी टीम आर्यन खानच्या ड्रग्स प्रकरणाच्या फायलींसह शाहरुख खानच्या घरी पोहोचली आहे.
अभिनेत्री अनन्या पांडे प्रख्यात अभिनेता चंकी पांडे याची मुलगी आहे. २०१९ मध्ये ‘स्टुडंट ऑफ द इयर २’ या चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. ‘पती, पत्नी और वो’, ‘खाली पिली’ या चित्रपटातूनही तिने अभिनय केला आहे.
वानखेडे बहीण-भावाकडून दुबई, मालदीवला जाऊन वसुली; नवाब मलिकांचा गंभीर आरोप
उगाही का धंधा मालदीव में! pic.twitter.com/ECzlOI70vG
— Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) October 21, 2021
कोरोना काळात संपूर्ण फिल्मइंडस्ट्री मालदीव आणि दुबईमध्ये होती. त्यावेळी समीर वानखेडे यांच्या परिवारातील लोकही उपस्थित होते, असा खळबळजनक आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे. दरम्यान, मालदीवमध्ये असलेले फोटो शेअर करुन समीर वानखेडे यांच्या परिवारातील सदस्य उपस्थित होते. याचे पुरावे नवाब मलिक यांनी सादर केले आहेत. समीर वानखेडे दुबई, मालदीवमध्ये होते का? त्यांची लेडी डॉन मालदीवमध्ये गेली होती का? याचं उत्तर अपेक्षित आहे, असेही नवाब मलिक म्हणाले.
सुशांतसिंग राजपूतच्या आत्महत्येनंतर समीर वानखेडे यांची एनसीबीमध्ये बदली करण्यात आली आणि लगेच रिया चक्रवर्ती हिला अटक करण्यात आली. ४-४ हजार रुपयांच्या पेमेंटच्या आधारावर गुन्हा दाखल करण्यात आला. व्हॉटस्ॲप चॅटच्या माध्यमातून अभिनेत्री व अभिनेत्यांना एनसीबीच्या दारात उभे करण्यात आले व दहशत निर्माण करण्याचे काम झाले असे सांगतानाच ही सर्व वसुली मालदीव व दुबईमध्ये झालीय असा थेट आरोपही नवाब मलिक यांनी केला आहे.
मलिकांच्या आरोपांना मनसेचं प्रत्युत्तर
नवाब मलिक यांच्या आरोपांना मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय. महाभ्रष्ट विकास आघाडीचे मंत्री नवाब मलिक यांनी आमच्या चित्रपट सेनेत काम करणाऱ्या जास्मिन वानखेडे यांच्यावर आरोप केला होता. जास्मिन वानखेडे या आमच्या पक्षात काम करतात याचा आम्हाला अभिमान आहे. मनसे चित्रपट सेनेवर आरोप केले त्याचे पुरावे आहेत का? एनसीबीने तुमच्या जावयावर कारवाई केली त्याचा राग तुम्ही अशाप्रकारे काढणार का? असा सवाल खोपकर यांनी केलाय. मनसे जास्मिन वानखेडे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी असल्याचं पाहायला मिळत आहे.




