
दुबई : राजस्थान रॉयल्सनं उभारलेला १८६ धावांचा डोंगर पंजाब किंग्ज यशस्वीरित्या सर करणार असंच चित्र असताना अखेरच्या षटकात पंजाबनं स्वत:च्याच पायावर कुऱ्हाड मारुन घ्यावी अशी लाजिरवाणी फलंदाजी केली आणि हातचा सामना गमावला आहे. राजस्थान रॉयल्सनं अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या रोमांचक सामन्यात २ धावांनी विजय प्राप्त केला आहे. एका क्षणी राजस्थानने सामना गमावलाच असे वाटत असताना अखेरच्या षटकात चमत्कार व्हावा तशी राजस्थानच्या कार्तिक त्यागीने गोलंदाजी केली. पंजाबला विजयासाठी आवश्यक ४ धावा रोखत कार्तिकने २ गडीही बाद केले. अखेरच्या षटकात विजयासाठी ४ धावांची गरज आणि हातात ८ विकेट्स असूनही पंजाबला आव्हान गाठता आलं नाही.
युवा गोलंदाज कार्तिक त्यागी राजस्थानसाठी तारणहार ठरला. अखेरच्या षटकात पंजाबच्या निकोलस पुरन आणि दिपक हुडा यांना बाद करत त्यागीनं जोरदार धक्का दिला. त्यागीनं अखेरचं षटक तीन निर्धाव चेंडू, दोन बळी आणि केवळ १ धाव दिली. केएल राहुल आणि मयांक अग्रवाल यांनी जबरदस्त सुरुवात १२० धावांची भागीदारी रचली होती.
केएल राहुलनं ३३ चेंडूत २ षटकार आणि ४ चौकारांच्या साथीनं ४९ धावा केल्या. तर मयांक अग्रवालनं ४३ चेंडूत २ षटकार आणि ७ चौकारांचा नजराणा पेश करत ६७ धावा कुटल्या होत्या. केएल राहुल-मयांक अग्रवाल जोडीनं आयपीएलमध्ये पाचव्यांदा शतकी भागीदारी रचली. राजस्थानच्या आव्हानाचा कोणताही दबाव निर्माण होऊ न देता आक्रमकपणे फलंदाजी केली. केएल राहुल आणि मयांक अग्रवाल बाद झाल्यानंतर पंजाबकडून पदार्पण करणाऱ्या अॅडन मारकरम २६ धावांवर नाबाद राहिला, तर निकोलस पुरन ३२ धावा करुन माघारी परतला. तर अॅलन फॅबियन आणि दिपक हुडा खातंही उघडू शकले नाहीत.
सामन्याची नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेल्या पंजाबच्या गोलंदाजांचा राजस्थानच्या सलामीवीरांनी जोरदार समाचार घेत जबरदस्त सुरुवात करुन दिली. राजस्थानचा युवा सलामीवीर यशस्वी जयस्वाल यानं आपल्या नजाकती फटक्यांचा नजराणा पेश करत पंजाबच्या गोलंदाजांवर दबाव निर्माण केला. तर राजस्थानकडून संधी मिळालेल्या अॅलन लुईसनंही संधीचं सोनं केलं. यशस्वी जयस्वालनं ३६ चेंडूत ४९ धावांची खेळी साकारली. यात २ खणखणीत षटकार आणि सहा चौकारांचा समावेश आहे. तर लुईसनं २१ चेंडूत ३६ धावांचं योगदान दिलं. दोघांनी सलामीसाठी ५४ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी रचली. त्यानंतर कर्णधार संजू सॅमसन (४) यावेळी चांगली कामगिरी करू शकला नाही. यष्टीरक्षक केएल राहुलनं सॅमसनचा सुंदर झेल टिपला आणि त्याला माघारी धाडलं. टी-२० प्रकारात सध्या तुफान फॉर्मात असलेल्या लियाम लिव्हिंगस्टोनही १७ चेंडूत २५ धावांचं योगदान दिलं. सामन्याच्या १२ व्या षटकात अर्शदिपच्या गोलंदाजीवर सीमारेषेजवळ पंजाबच्या अॅलन फॅबियननं लिव्हिंगस्टोनचा सुंदर झेल टिपला.
राजस्थानच्या धावसंख्येचा आलेख चढता ठेवण्याचं काम महिपाल लोमरार यानं केलं. अवघ्या १७ चेंडूत ४ खणखणीत षटकार आणि २ चौकारांच्या साथीनं महिपालनं ४३ धावा कुटल्या. अखेरच्या पाच षटकांमध्ये राजस्थानच्या धावसंख्येला लगाम घालण्यात पंजाबला यश आलेलं पाहायला मिळालं. महिपाल बाद झाल्यानंतर राजस्थानचा संपूर्ण संघ मोठे फटके मारण्याच्या नादात बाद झाला. रियान पराग, राहुल तेवतिया, ख्रिस मॉरिस, चेतन साकरिया, कार्तिक त्यागी यांना दोन अंकी आकडा देखील गाठता आला नाही.
राजस्थानचा कॅप्टन संजू सॅमसनला १२ लाखांचा दंड
राजस्थान रॉयल्सला पंजाब विरुद्ध रोमहर्षक मॅचमध्ये विजय मिळवल्यानंतरही फटका बसला आहे. टीमचा कॅप्टन संजू सॅमसनला स्लो ओव्हररेटमुळं दंड झाला आहे. आयपीएल मॅनेजमेंटनं संजू सॅमसनला १२ लाखांचा दंड केला आहे. संजू सॅमसनला हा दंड भरावा लगणार आहे. मात्र, पंजाबवर मिळवलेल्या विजयामुळं राजस्थान रॉयल्सनं गुणतालिकेत ५ व्या स्थानावर झेप घेतली आहे.
केएल राहुलचा जबरदस्त कारनामा!
पंजाब किंग्जचा कर्णधार केएल राहुल आयपीएलमध्ये तुफान फॉर्मात आहे. पंजाबचं नेतृत्त्व करताना त्याच्या कामगिरीतही कमालीची सुधारणा झाल्याचं पाहायला मिळत आहे. राजस्थान रॉयल्स विरुद्धच्या आजच्या सामन्यातही केएल राहुल गोलंदाजांची अक्षरश: पिसं काढतोय. केएल राहुलची आयपीएलमधील कामगिरी नक्कीच उल्लेखनीय राहिलेली आहे आणि त्यानं आज अनोख्या विक्रमाला गवसणी घातली आहे. केएल राहुल आता तीन हजारी मनसबदार झाला आहे. आयपीएलमध्ये केएल राहुलनं ३ हजार धावांचा टप्पा ओलांडला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे केएल राहुलनं अवघ्या ८० सामन्यांमध्येच ३ हजार धावांचा पल्ला गाठण्याचा कारनामा केला आहे. याआधी अशी कामगिरी ख्रिस गेलनं केली आहे. विस्फोटक फलंदाजीसाठी ओळखल्या जाणाऱ्या गेलनं अवघ्या ७५ सामन्यांमध्ये ३ धावा पूर्ण केल्या होत्या. सर्वात जलद गतीनं ३ हजार धावांचा टप्पा ओलांडण्याच्या शर्यतीत डेव्हिड वॉर्नर (९४ सामने) तिसऱ्या आणि सुरेश रैना (१०३ सामने) चौथ्या स्थानावर आहे.




