ठाकरे सरकारमुळे हिंदुत्व धोक्यात : आ. नितेश राणे

मुंबई : मातोश्री, वर्षामध्ये जे महायज्ञ असतात ते कशासाठी आहेत? सरकार ५ वर्षे चालणार असं म्हणता मग काळी जादू, बुवाबाजी कशाला करता?, पैसे, भ्रष्टाचार, बदल्यांसाठी, वसुलीवरुन या तिन्ही पक्षांमध्येच भांडणं आहे. हिंदुत्व बासनात गुंडाळले आहे. केवळ हिरवे कपडे घालणंच बाकी आहे अशा शब्दात भाजपा आमदार नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. हिंदू सण, हिंदू मंदिरं नको अशी परिस्थिती राज्यात ठाकरे सरकारने केलीय. महाराष्ट्रात हिंदू खतरे मे है असं म्हणण्याची वेळ आली आहे. मुंबईतला हिंदू कसा संपेल असा किमान समान कार्यक्रम महाविकास आघाडीकडून चालवला जात आहे. काँग्रेस राष्ट्रवादीमुळे शिवसेनेने हिंदुत्व सोडलं आहे. मालवणीत हिंदुंना अक्षरश: पळवलं जातंय. हिंदू मुलींना टार्गेट केलं जातंय. सेक्युलरच्या नावाखाली शिवसेनेने बाळासाहेबांचे हिंदुत्व बाजूला सारलंय. ज्या बाळासाहेबांनी हिंदुत्वाचं रक्षण करून मुंबई सुरक्षित केली, त्यांचाच मुलगा ते संपवायच्या मागे लागलाय. त्यामुळे बाळासाहेबांचा आशीर्वाद हा भाजपाला कायम आहे असं त्यांनी सांगितले.
एका मराठी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत नितेश राणे यांनी शिवसेना नेत्यांचा खरपूस समाचार घेतला. नारायण राणे यांचा मुंबईच्या राजकारणाबद्दल अनुभव आहे. हा नेता आशिष शेलार, लोढा यांच्या सगळ्यांसोबत उभा राहिला. तर गेल्या ३५ वर्षापासून मुंबईत जी सत्ता आहे. बेजबाबदार कारभार सुरु आहे. त्याला चांगला पर्याय देता येईल. परंतु अद्याप राणेंवर महापालिकेची धुरा दिल्याची कुठलीही अधिकृत माहिती नाही. पण त्याचसोबत आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात शिवसेना निवडणूक लढणार असेल तर त्यासाठी शुभेच्छा आहे. कारण त्यांच्यामुळे तर भाजपासाठी ही निवडणूक सोप्पी जाईल. बाळासाहेबांची शिवसेना कुणी संपवली असेल तर ती ही नाईट लाइफ वाल्यांनी संपवली आहे. मग प्रचारात दिनो मोरिया, दिशा पटानी दिसतील आणि जुने शिवसैनिक मागेच राहतील असं नितेश राणे यांनी सांगितले.
आपल्या देशाचा अपमान होत असताना भारतीय नागरिक गप्प बसतील का? एका मुख्यमंत्र्यांना अमृत महोत्सव की हिरक महोत्सव विचारावं याविरोधात तो संताप आहे. आमच्या घरावर जी मुलं पाठवली. आम्ही कुणीही नव्हतो तेव्हा ते सगळे घरावर आहे. पण आता ती वैयक्तिक लढाई त्यांनी केली. आमच्या घरात मुलं होतं. उद्या जर काही झालं असतं तर त्याला जबाबदार कोण असतं? आमच्या वडिलांना शिव्या घालताना आम्ही विरोध करायचा नाही का? मग तुम्ही जी भाषा वापरता ती आम्ही वापरली तर ते चालत नाही. सुरुवात त्यांनी केली पण आता व्याजासह प्रत्युत्तर आम्ही देऊ असा इशाराही नितेश राणेंनी दिला.
सगळे जुने शिवसैनिक बाजूला पडलेत. गेल्या २ वर्षाच्या काळात जुने शिवसैनिक कुठेही दिसत नाही. जुन्या शिवसैनिकांचा पूर्ण पाठिंबा भाजपाला आहे. ही बाळासाहेबांची शिवसेना, हिंदुत्ववादी शिवसेना राहिली नाही. बाळासाहेबांच्या तालमीतला शिवसैनिक, ज्यांनी बाळासाहेबांचे विचार शिवाजी पार्कवर बसून ऐकलेत त्यांना हे कदापि हे सहन न होणार आहे. जुने शिवसैनिक म्हणून नारायण राणे बाळासाहेबांच्या स्मारकाला नतमस्तक व्हायला गेले होते. येणाऱ्या महापालिका निवडणुकीत त्याचे पडसाद पाहायला मिळतील.
मुळात राणेसाहेब आणि उद्धव ठाकरे यांच्यात चांगले नाते होते. आम्ही तेजस, आदित्य बरोबर खेळलो आहे. परंतु संजय राऊत, सुभाष देसाई आणि अनिल परब यासारखी काही मंडळी आहे. ज्यांना हे नकोय. राणे-राज-उद्धव एकत्र असते तर आज महाराष्ट्रासाठी वेगळं चित्र असतं. उद्धव ठाकरेंना कोण जवळचं आहे हे ओळखता आलं तर आदित्य आणि शिवसेनेसाठी चांगले आहे. संजय राऊतांनी लोकप्रभात असताना सातत्याने बाळासाहेब-मासाहेब यांच्यावर टीका केली होती. ज्या दिवशी संजय राऊतांबद्दल उद्धव ठाकरे यांना कळेल तेव्हा त्यांचे भलं होईल असं ते म्हणाले आहेत.
नारायण राणेंना शिवसेनाबद्दल इतकं माहिती आहे की, काही घटना, आडनावं सांगितली तर शिवसेनेला ते जड जाईल हे माहिती आहे. परंतु राजकारण हे राजकारणासाठी असतं. वैयक्तिक टीका झाली तर त्याला उत्तर देण्यास आम्हीही कमी पडणार नाही. नारायण राणे हे केंद्रीय मंत्री आहेत. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आहेत. जर महाराष्ट्र हिताच्या दृष्टीने, तरुणांच्या रोजगाराबद्दल काही सकारात्मक प्रस्ताव घेऊन यायचे असतील. तर निश्चितच नारायण राणे त्यासाठी पुढाकार घेतील असंही नितेश राणे यांनी सांगितले.
नितेश राणेंनी या मुलाखतीत संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला. बाजारात असे खूप लोकं भेटतील. जे तुमच्यासाठी ट्विट करतील, तुमच्यासाठी लोमटेगिरी करतील, पैसे फेकल्यास बाजारात संजय राऊतांसारखे खूप लोकं मिळतात. पैसा फेको तमाशा देखो अशी ती व्यक्ती आहे.




