
काबुल : अफगाणिस्तानचे राष्ट्रपती अश्रफ घनी राजीनामा देण्याची शक्यता आहे. अफगाणिस्तानमधील विविध प्रांतामध्ये सुरु असलेल्या चकमकी थांबवणे आणि तालिबानशी तत्काळ युद्धविराम करण्याच्या उद्देशानं घनी हा निर्णय घेण्याची शक्यता आहे. अफगाणिस्तानचे राष्ट्रपती घनी राजधानी काबूलचं संरक्षण व्हावं यासाठी मजार-ए-शरीफमध्ये गेले होते. त्यावेळी सरकारशी संबंधित मिलिशिया कमांडरांसोबत त्यांची बैठक झाली.
तालिबान दहशतवादी अफगाणिस्तानची राजधानी काबूलच्या अगदी जवळ आले आहेत. त्याचवेळी शांतता चर्चा समिती नवा मसूदा तयार करत आहे. यामध्ये राष्ट्रपती अश्रफ घनी सरकारला पायउतार व्हावे लागण्याची शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अफगाणिस्तानमध्ये युद्धविराम करण्यासाठी नवा तोडगा काढण्यावर चर्चा सुरू आहे. यानुसार तालिबान, लष्करी अधिकारी आणि विद्यमान सरकारमधील काही प्रतिनिधी यांचे एकत्र हंगामी सरकार बनेल. याबाबत सर्व प्रकारची चर्चा आणि विचार विनिमय झाल्यानंतर या सत्तावाटपाचा फॉर्म्युला संबंधित पक्षांना दिला जाईल. हा प्रस्ताव सध्या प्राथमिक अवस्थेत आहे. त्यामुळे अजून ही योजना अफगाणिस्तान सरकार किंवा तालिबान यापैकी कुणाशीही शेअर करण्यात आलेली नाही.
अफगाणिस्तानवरील तालिबानचे वाढते वर्चस्व लक्षात घेऊन अमेरिकी दूतावास रिकामा करण्यास मदत करण्यासाठी अमेरिकन मरीन बटालीयनची ३००० सैन्यांची तुकडी शुक्रवारी अफगाणिस्तानात दाखल झाली आहे. उर्वरित सैन्य रविवारी दाखल होणार आहे. अफगाणिस्तानात अमेरिकेचे अतिरिक्त सैन्य दाखल होत असल्यानं अमेरिका यापूर्वी जाहीर केलेली ३१ ऑगस्टच्या डेडलाईन पाळणार की नाही ? हा प्रश्न निर्माण झाला आहे.
दक्षिण अफगाणिस्तानात मुसंडी मारत तालिबानचा आणखी ४ शहरांवर कब्जा
अफगाणिस्तानधून अमेरिकन फौज माघारी परतल्यापासून तालिबानने आपली पकड मजबूत करीत एकापाठोपाठ दक्षिण अफगाणमधील हेल्मंदसह प्रांतांची राजधानी असलेले शहर लश्करगाहसह आणखी ४ प्रांतांच्या राजधानीच्या शहरांपाठोपाठ पश्चिमेकडील घोर प्रांताच्या राजधानीवर कब्जा केला. काबूलला सध्या थेट धोका नाही; परंतु, इतर ठिकाणी तालिबानने पकड मजबूत केली असून तालिबानच्या कब्जात अफगाणिस्तानमधील दोनतृतीयांश भाग आला असून तालिबान आणि सुरक्षा दलादरम्यान लढाई चालू आहे.
तालिबानने शुक्रवारी दुसरे सर्वात मोठे शहर कंदहारवर कब्जा केल्याचा दावा केला. अफगाणिस्तान सुरक्षा दलाच्या एका वरिष्ठ सूत्रांनी तालिबान बंडखोराच्या दाव्याला दुजोरा देत सांगितले की, तालिबानच्या कब्जात प्रमुख शहर लश्करगाहही गेले आहे. तालिबानने काबूलच्या दक्षिणेकडील लोगार प्रांताकडे जोरदार कूच करीत पुली-ए-अलीममधील पोलीस मुख्यालय आणि जवळचा तुरुंग ताब्यात घेतला आहे. तालिबानची राजधानी काबूलच्या दिशेने आगेकूच चालू आहे. तालिबानच्या एका प्रवक्त्याने ट्वीटमध्ये म्हटले की, कंदहार जिंकत आम्ही शहीद चौकात पोहोचलो आहोत. एका स्थानिक नागरिकानेही तालिबानच्या या दाव्याला दुजोरा दिला.




