
पैशाच्या लोभापोटी गुन्हेगारी क्षेत्राशी जवळीक साधत स्वत:च डॉन होण्याचा प्रयत्न करू पाहणारा ऑलिम्पिक कुस्तीपटू सुशीलकुमारच पैलवान सागर धनकडच्या खूनातील प्रमुख आरोपी असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. दोन दिवसांपूर्वी दिल्ली पोलिसांनी पैलवान सागर धनकड खून खटल्यात एक हजार पानांचे आरोपपत्र न्यायालयात दाखल केले.या आरोपपत्रात दोन वेळा ऑ कुस्तीत ब्रांझपदक प्राप्त करणाऱ्या कुस्तीपटू सुशीलकुमारला मुख्य आरोपी करण्यात आले असून अन्य अकरा इतर आरोपी आहेत.
४ मे २०२१ रात्री कुस्तीपटू सुशीलकुमारने पैलवान सागर धनकड व त्याचा साथीदार सोनू महाल याच्यासह चौघांना दिल्लीतील छत्रसाल स्टेडियमच्या आवारात जबरदस्त मारहाण केली यात दुसऱ्या दिवशी सकाळी सागर गतप्राण झाला. यानंतर पैलवान सुशीलकुमार हा पोलिसांना चकवा देत होता. अखेर पोलिसांनी त्याला अटक केली. या खुनाचा इतिहास पाहता वरकरणी त्याचे दोन टप्पे होऊ शकतात. पहिला टप्पा पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्राचा विचार करता सुशिलकुमार आणि सागर धनकड हे दोघे कुस्तीपटू, सागर हा सुशिलकुमारच्या पत्नीच्या नावे दिल्लीतील मॉडर्न टाॅऊन परिसरातील फ्लॅटमध्ये भाडेकरू म्हणून एका मित्रासोबत राहत होता. ज्या सोसायटीत हा फ्लॅट होता तेथे पार्किंगवरून धनकडचा शेजाऱ्यांबरोबर वाद झाला परिणामी घरमालक म्हणून सुशीलकुमारने धनकडला जागा करण्यास सांगितले, पण धनकड फ्लॅट सोडण्यास टाळाटाळ करत होता. यातून या दोघांमध्ये सातत्याने बाचाबाची सुरू होती त्याचे पर्यावसान धनकडच्या खुनात झाले. सुशीलकुमार याने केलेल्या जबरी मारहाणीत धनकड मरण पावला. या मारहाणीची एक मिनिटाची चित्रफित पोलिसांकडे असून त्या आधारे सुशीलकुमारला मुख्य आरोपी करण्यात आले आहे.
पोलिसांनी आरोपपत्रात ज्या गोष्टींचा उल्लेख केला नाही त्याचा विचार करता सुशिलकुमार हा पैलवान सागर धनकड याचा कुस्तीतील गुरू होता. सागर सुशीलकुमारला आपला आदर्श मानत होता. म्हणूनच सागर आपल्या एका मित्रासोबत दरमहा चाळीस हजार रुपये भाडे देऊन सुशीलकुमारच्या सुमारे तीन कोटी रुपयांच्या घरात मागील दीड वर्षापासून राहत होता. कोरोनामुळे छत्रसाल स्टेडियमला टाळे लागल्याने कुस्ती चा सराव ठप्प होता याच काळात दिल्लीतील कुख्यात डॉन काला जठेडियाच्या संपर्कात धनकड आला. सुशिलकुमार हा देखील एकेकाळी काला जठेडियाच्या जवळचा होता. जठेडियावर शंभराहून अधिक अपराधाची गुन्ह्याची नोंद आहे त्यामध्ये खून, जबरीने वसूली, जागा देणे घेणे, त्याचबरोबर जागा बळकावणे आदी जबरी गुन्ह्यात तो माहिर आहे. यात त्याला सुशिलकुमार मदत करत असे, यानंतर दोघांमध्ये पैशाच्या व्यवहारातून वाद झाला आणि सुशिलकुमार त्याच्यापासून बाजूला झाला. कालांतराने जठेडियाचा दुश्मन निरज बवानाबरोबर सुशिलकुमारचे सूत जुळले. बवाना हा सुद्धा दुसरा जठेडियाच. हे दोघेही सध्या तिहारच्या तुरुंगात असूनही तेथून आपला धंदा सुरू ठेवतात याचा अर्थ हा काळा धंदा पोलिस संरक्षणात सुरू आहे.
जठेडियाचा भाचा सोनू महाल हा सागर धनकडचा मित्र असल्याने सागरचा वावर गुन्हेगारी क्षेत्रात होत होता. सुशिलकुमार याने ऑलिम्पिकमधील पहिलं पदक मिळवून आणलं त्यानंतर त्याचा वापर दिल्लीतील गुंडांनी सुरू केला. हळूहळू सुशिलकुमार पैशाच्या हव्यासापोटी स्वत:च गुन्हेगारी क्षेत्रात नावारूपाला आला. त्याच काळात त्याने कुस्तीतील दुसरें पदक जिंकून इतिहास घडवला मग त्याचा गुन्हेगारीतील वापर आणि वावर अधिक वाढला. याचा फायदा घेत सुशिलकुमारने दिल्ली पाठोपाठ हरियाणा आणि पंजाब प्रांतात असणाऱ्या टोलनाक्यावर वसूलीसाठी टोळी निर्माण केली असं पोलिस सुत्रांचे मत आहे.
सुशिलकुमार याच्या आयुष्याची विभागणी आता दोन प्रकारात मोडते. एक कुस्तीपटू सुशीलकुमार आणि दुसरा गुन्हेगारी क्षेत्रात नावारूपाला आलेला सुशिलकुमार. दहा वर्षांपूर्वी सुशिलकुमारने कुस्तीपटू म्हणून अहोरात्र मेहनत घेतली आणि कुस्तीत शिखर गाठले. त्यानंतरचा सुशिलकुमार निराळाच होता परिणामी तो तिहारच्या तुरुंगात सागर धनकडच्या खूनात संभाव्य आरोपी म्हणून अटकेत आहे. सरतेशेवटी मिळालेला मान आणि असणारा पैसा कसा टिकवावा यांचे तारतम्य सुशिलकुमारकडे नव्हते म्हणूनच देशातील तमाम जनतेला हवाहवासा वाटणारा हिरो तिहारच्या कोठडीत आपल्या आयुष्याची गोळाबेरीज करण्यात व्यस्त आहे .




