विम्बल्डन टेनिस : जोकोविचचा चौथ्या फेरीत प्रवेश

लंडन : सर्बियाचा अव्वल सीडेड टेनिसपटू आणि गतविजेत्या नोवाक जोकोविचने विम्बल्डन ग्रँड स्लॅम स्पर्धेत आपली दमदार कामगिरी सुरु ठेवली आहे. त्याने अमेरिकेच्या डेनिस कुडला सरळ सेटमध्ये पराभव करत पुरुष एकेरीच्या चौथ्या फेरीत प्रवेश केला. जोकोविच यंदा सहाव्यांदा विम्बल्डनचे जेतेपद पटकावण्याच्या प्रयत्नात असून त्याने तिसऱ्या फेरीच्या सामन्यात जागतिक क्रमवारीत ११४ व्या स्थानावर असलेल्या डेनिस कुडलाचा ६-४, ६-३, ७-६ असा सरळ सेटमध्ये पराभव केला. जोकोविचचा हा विम्बल्डन स्पर्धेतील एकूण ७५ वा विजय ठरला.
जोकोविचला यंदा विम्बल्डन जिंकण्यासाठी प्रमुख दावेदार मानले जात असून त्याला १३ व्यांदा या स्पर्धेची चौथी फेरी गाठण्यात यश आले आहे. तिसऱ्या फेरीत जोकोविचने अप्रतिम खेळ केला. त्यामुळे त्याने पहिले दोन सेट ६-४ आणि ६-३ असे सहजपणे जिंकले. तिसऱ्या सेटमध्ये कुडलाने चांगली झुंज दिली. त्यामुळे या सेटचा विजेता ठरवण्यासाठी टाय-ब्रेकर झाला. यात जोकोविचने ९-७ अशी बाजी मारत तिसरा सेट ७-६ असा जिंकला आणि चौथ्या फेरीत प्रवेश केला.
टियाफोचे आव्हान संपुष्टात
रशियाच्या आंद्रेय रुब्लेवलाही स्पर्धेत आगेकूच करण्यात यश आले. पाचव्या सीडेड रुब्लेवने पुरुष एकेरीच्या तिसऱ्या फेरीच्या सामन्यात इटलीच्या फाबिओ फॉगनिनीचा ६-३, ५-७, ६-४, ६-२ असा पराभव केला. पहिल्या फेरीत स्टेफानोस त्सीत्सीपासला पराभवाचा धक्का देणाऱ्या अमेरिकेच्या फ्रान्सिस टियाफोचे आव्हान संपुष्टात आले. तिसऱ्या फेरीत त्याला कारेन खाचानोव्हने ६-३, ६-४, ६-४ असे पराभूत केले.




