चित्ती असू द्यावे समाधान (उधोजीराजेंचे देवानानांना खरमरीत उत्तर !)
- मुकुंद परदेशी (संपर्क ७८७५० ७७७२८)

प्रति,
देवानाना नागपूरकर यांसी (सशर्त)सप्रेम नमस्कार. आपले पत्र मिळाले. उघडताच कुजकट वास आला. आजूबाजूला एखादा उंदीर मरून पडला आहे की काय अशी शंका आली. पत्र वाचले आणि कळले की पत्रातला मजकुरच कुजकट होता ! गुलाबदाणीतून गुलाबजलच बाहेर येणार, अत्तरदाणीतून अत्तरच बाहेर येणार, तसेच – – . जाऊ द्या. पुढे काय लिहावे, आपण सुज्ञ आहातच. नावापुढे काय लिहिले जाते याची चिंता ज्यांच्या नावात दम नसतो तेच करत असतात. मला ती चिंता नाही. किंबहुना असल्या फालतू गोष्टींकडे मी लक्ष देत नाही. किंबहुना मला वेळच नाही. आणि असावा तरी कसा ? या महाराष्ट्राला मी माझं कुटुंब समजून अहोरात्र सांभाळतोय. असा रात्री दोन वाजता कोणाला मेसेज करण्याइतका किंवा कोणाचा मेसेज वाचण्याइतका रिकामटेकडा मी अजिबात नाही. नाहीच मुळी. ज्याला काही काम नसेल त्यानेच करावेत असले रिकामटेकडे उद्योग. रात्री दोन वाजता मेसेज पाठविणारेही तसेच आणि वाचणारेही तसेच. असो.
माझ्या दिल्ली दौऱ्याची आपण चिंता वाहू नये. माझ्यासाठी आपण ठरविलेला मेनू उत्तम होता. आपल्याला दिल्लीश्वरांच्या भटारखान्यातही ड्युटी बजवावी लागते हे नव्यानेच कळले ! ( म्हणजे तसे काही एकदमच रिकामे आहात असेही नाही, हेही नव्यानेच कळले !) माझे आणि दिल्लीश्वरांचे काय बोलणे झाले याबाबत आपण उगाच जास्त चौकश्या करू नये. ‘जब दो बुजुर्ग बाते करते हैं, तो बच्चे बीचमे नही बोला करते जानी.’ अर्थ समजून घ्या. दिल्लीश्वरांनी तुम्हाला, ‘ आता तुम्ही काहीच करू नका. शांत राहा. उधोजीराजेच सर्व काही घडवून आणतील.’ असा जो निरोप दिला आहे ना! त्याचा अर्थ, ‘आता उधोजीराजेच राज्य सांभाळतील, निश्चिंत असा.’ असा आहे. आलं लक्षात ?
पत्र कोणी लिहिलं की, कोणी लिहून घेतलं असल्या फालतू गोष्टींमध्ये (तुमच्याकडे भरपूर असला तरी) उगाच वेळ घालवू नका. मला कुठलेही क्लासेस घेण्याची गरज नाही. उलट मी तर म्हणेन की, तुम्हीच ‘राजकारणात कोणत्या चुका करू नयेत’ या विषयावर व्याख्यान द्यायला सुरुवात केली तर देशातलेच नाही तर जगभरातले राजकारणी गर्दी करतील. विचार करा.
माझ्या कॉलेज जीवनातला एक किस्सा आठवतो. कॉलेजमधला एक बावळट कॉलेज क्वीनच्या मागे लागला. ती मैत्रिणीकडे पाहून हसली. या बावळटाला वाटलं हाच तो ‘ संकेत मिलनाचा’ ! नको ते उपद्व्याप करायला गेला आणि सर्वांसमोर थोबाड रंगवून घेतलं ! सुज्ञ आहात. समजून घ्या. तुमची बुलेट ट्रेन अजून पेंडिंग आहे. ( कोणाचं जुनाट इंजिनही यार्डातच पडून आहे !) पण आमची तीन चाकी रिक्षा भन्नाट धावते आहे. आमच्या रिक्षाचं कोणतंच चाक वेगळं होऊन ‘स्वबळावर’ धावणार नाहीये. कोणी जर ‘स्वबळा’ची भाषा केली तर याला आता ‘धौती योग’ घ्यायची गरज उरलेली दिसत नाही, एवढाच माझ्यालेखी त्याचा अर्थ असतो. आपण निष्कारण स्वप्ने रंगवू नयेत.
आपण ‘ अखंड सावधान असावे.’ म्हणून केलेला उपदेश आवडला. पंचवीस-तीस वर्षे जरी असंतांसोबत घालवली असली तरी माझाही संत साहित्याचा बऱ्यापैकी अभ्यास आहे. ‘ भले तरी देऊ कासेची लंगोटी । नाठाळाचे माथी हाणू काठी ।’ मी आचरणात आणतोच आहे. (आपल्याला वेगळं सांगण्याची गरज नाही.) सद्यस्थितीत आपल्याला उपयोगी पडेल असे काही खाली देत आहे.
ठेविले अनंते तैसेचि रहावे । चित्ती असू द्यावे समाधान ।
सत्ता जाणे घडे पातकाचे मूळ । संचिताचे फळ आपुलिया ।
मग वायावीण दुःख वाहू नये । रुसोनीया काय देवावरी ।
आपला हितचिंतक
उधोजीराजे (सिर्फ नाम ही काफी है !)
ता.क. – तुमचा नमस्कार आणि निरोप तुमच्या वहिनींना पोहचवला. ‘लाज कशी वाटत नाही?’ असं काहीसं त्या पुटपुटल्या असाव्यात असे वाटते. जाऊ द्या. बायका थोड्या विचित्रच असतात. नाही का? बाळराजेंना भेटणे टाळत चला. कोवळं वय आहे, संगतीने बिघडू नये असे वाटते.
– उधोजीराजे




