Top Newsराजकारण

महाविकास आघाडी केवळ ५ वर्षांसाठी : नाना पटोले

मुंबई : स्वबळाचा नारा लावणं चुकीचं नाही. त्यात काही गैर आहे असं मला वाटत नाही. असा नारा दिल्याने महाविकास आघाडीला कोणताही धोका नाही. काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी शब्द दिला आहे. त्यामुळे काँग्रेस पाच वर्ष शिवसेनेसोबत सत्तेत राहणार आहे, अशी ग्वाही देतानाच राज्यात काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आघाडी कायमस्वरुपी झालेली नाही. राज्यात पाच वर्षांसाठी तिन्ही पक्षांची आघाडी झालेली आहे, असं विधान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलं आहे. ते मुंबईत प्रसार माध्यमांशी बोलत होते.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त शिवसैनिकांशी संवाद साधल्यानंतर नाना पटोले यांनी हे विधान केलं आहे. केवळ निवडणुकीसाठी स्वबळाची घोषणा करण्याला अर्थ नाही. जनतेच्या अडचणी सोडवण्यासाठीचं स्वबळ पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये निर्माण व्हायला हवं, असं विधान उद्धव ठाकरे यांनी केलं होतं. याबाबत नाना पटोले यांना विचारण्यात आलं असता मुख्यमंत्र्यांनी भाषणातून नेमका कुणाला सल्ला याची स्पष्टता झालेली नाही, असं म्हटलं आहे.

काँग्रेससोबत भाजपनंही स्वबळाचा नारा दिला आहे. याआधीही भाजप, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी स्वबळावर निवडणुकीला सामोरे गेलेले आहेत. त्यामुळे यात काहीच गैर नाही, असंही ते म्हणाले. महाराष्ट्रात भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी महाविकास आघाडीची पाच वर्षांसाठी निर्मिती झाली. महाविकास आघाडी काही कायमस्वरुपासाठी झालेली नाही. पक्षाची ताकद वाढविण्याचा अधिकार प्रत्येक पक्षाला आहे आणि कोरोना काळात जनतेला मदत करण्याला काँग्रेस पक्षानं नेहमीच प्राधान्य दिलं आहे. मग ते रक्तदान असो, ऑक्सिजन असो किंवा मग प्लाझ्मा कोरोना काळात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी खूप मोठी मदत केली आहे, असं नाना पटोले म्हणाले.

उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसच्या स्वबळाच्या नाऱ्याबाबत केलेलं विधान हे राज्याचे मुख्यमंत्री म्हणून नव्हे, तर शिवसेना पक्षाचे प्रमुख म्हणून केलेलं आहे. प्रत्येक पक्षाला मोठं होण्याचा आणि पक्ष वाढविण्याचा अधिकार आहे, असंही नाना म्हणाले.

संजय राऊतांना टोला

काँग्रेसमध्ये स्वबळावर लढण्याबाबतचं एकमत आहे. आम्ही स्वबळावर लढणार असून त्याची तयारी सुरू झाली आहे. त्यामुळे आम्ही स्वबळावर लढणारच. आता स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक येत आहे. त्यात आम्ही स्वबळावर लढू, असं सांगतानाच ते कदाचित आमची भाषणं ऐकत नसतील, असा चिमटा पटोले यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांना काढला.

तो शिवसेनेचा अंतर्गत प्रश्न

शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्रं लिहून भाजपशी युती करण्याचं आवाहन केलं आहे. त्यावरही त्यांनी अधिक प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. सरनाईकांनी पत्रं लिहिलं. हा शिवसेनेचा अंतर्गत प्रश्न आहे. त्यात काँग्रेस पडणार नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं.

काँग्रेसशिवाय पर्याय नाही

राज्यात आम्ही वेगवेगळी आंदोलने करतोय. आम्ही ‘मोदी हटाव, देश बचाव’चा नारा देऊन काम करतोय. देशाला आता काँग्रेस शिवाय पर्याय नाही. राहुल गांधी हे व्हिजन असलेलं नेतृत्व आहे, असंही त्यांनी सांगितलं.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button