मालवणी दुर्घटनेतील इमारत बांधणाऱ्या कंत्राटदाराला १६ जूनपर्यंत पोलीस कोठडी

मुंबई : मुंबईच्या मालाड पश्चिमेकडील मालवणी भागात एक चार मजली इमारत बुधवारी रात्री कोसळून झालेल्या दुर्घटनेत अकरा जणांचा मृत्यू झाला आहे. तर सात जण जखमी झाले असून त्यांना बीडीबीए रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ज्यावेळी ही दुर्घटना घडली, त्यावेळी काही मुलांसह अनेक लोक या इमारतीमध्ये होते. याप्रकरणी आता इमारतीचे मालक आणि इमारत बांधणाऱ्या कंत्राटदाराला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे.
रमझान शेख असं या इमारतीचे बांधकाम करणाऱ्या ठेकेदाराचं नाव असून पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. तसेच, इमारतीचा मालक रफिक सिद्दिकी यासही ताब्यात घेण्यात आले आहे. कंत्राटदार रमझान शेख यांस अटक केल्यानंतर न्यायालयात उभे केले असता १६ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. मालवणी इमारत दुर्घटनेची माहिती मिळताच तातडीने अग्नीशमन दलाचे जवान आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर स्थानिक लोकांच्या मदतीने इमारतीच्या ढिगाऱ्याखली अडकलेल्या १५ हून अधिक लोकांना बाहेर काढण्यात आले. तसेच, इमारतही खबरदारी म्हणून रिकामी करण्याचा निर्णय घेण्यात आला. येथील रहिवाशांना तातडीने अन्यत्र हलवण्यात आले आहे.
मालाडमधील मालवणी गेट क्र. ८ येथे अब्दुल हमीद मार्गावर न्यू कलेक्टर कंपाऊंड परिसरात बुधवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास ही दुर्घटना घडली. इमारत अचानक कोसळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. या दुर्घटनेत अकरा जणांचा मृत्यू झाला. तर सात जण जखमी झाले असून त्यांना बीडीबीए रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोहचलेल्या अग्निशमन दलाच्या जवानांकडून युद्धपातळीवर मदतकार्य सुरू करण्यात आले.




