घर-दुकानांत पाणी शिरलेल्यांना १० हजार, तर अन्नधान्य खरेदीसाठी ५ हजार रुपये
पूरग्रस्तांसाठी तातडीची मदत जाहीर

मुंबई : राज्यातील पूरग्रस्तांसाठी मदत व पुनर्वसन मंत्रालयाकडून तातडीच्या मदतीची घोषणा करण्यात आली आहे. राज्यात विविध ठिकाणी मुसळधार पावसामुळे महापुराचं थैमान घातलं. यात अनेक ठिकाणी जवळपास १० ते १२ फुटांपर्यंत पाणी साचलं होतं. सध्या बहुतांश ठिकाणी पाणी ओसरलं असलं तरी नागरिकांचं आणि व्यापाऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. अशावेळी राज्य सरकारकडून तातडीच्या मदतीची घोषणा करण्यात आली आहे.
ज्या घरांमध्ये आणि दुकानांमध्ये पुराचं पाणी शिरलं त्यांना १० हजार रुपयांची तातडीची मदत, तर अन्नधान्य खरेदीसाठी ५ हजार रुपयांच्या मदतीची घोषणा राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत आज सांगलीत जिल्ह्यातील पूर परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. यावेळी अजित पवार यांनी पूरग्रस्तांची विचारपूस देखील केली. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत पूरग्रस्तांच्या मदतीसाठीचा निर्णय घेण्यात आला. बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत विजय वडेट्टीवार यांनी मदतीची घोषणा केली आहे.