राजकारण

आंदोलनातील ७०० शेतकऱ्यांच्या मृत्यूला राकेश टिकैत जबाबदार; भाजप नेत्याचे वादग्रस्त वक्तव्य

लखनऊ : राजधानी दिल्लीमध्ये शेतकऱ्यांच्या आंदोलनाचं नेतृत्व करणाऱ्या राकेश टिकैत यांच्याबद्दल भाजप नेत्यानं वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. आंदोलनादरम्यान झालेल्या ७०० शेतकऱ्यांच्या मृत्यूला राकेश टिकैत जबाबादर असल्याचं वक्तव्य भाजप नेते हरिनारायण राजभर यांनी केलं आहे. कृषी कायदे मागे घेण्यासाठी दिल्लीमध्ये मागील वर्षभरापासून आंदोलन करत आहे. सरकारने कृषी कायदे मागे घेतले आहेत, पण शेतकरी एमएसपी कायद्यावर ठाम आहेत. शेतकऱ्यांनी आंदोलन अद्याप मागे घेतलेलं नाही, अशातच भाजप नेत्याच्या वक्तव्याने पुन्हा एकदा राजकारण तापण्याची शक्यता आहे.

उत्तर प्रदेशमधील भाजपचे माजी खासदार हरिनारायण राजभर यांनी भारतीय किसान युनियनचे नेता राकेश टिकैत यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. तीन कृषी कायद्याविरोधात आंदोलनादरम्यान मृत्यू पावलेल्या सातशे शेतकऱ्यांच्या मृत्यूला राकेश टिकैत यांना जबाबदार मानलं आहे. यासोबत राकेश टिकैत यांच्याविरोधात गुन्हा दाखल करुन संपत्ती जप्त करण्याची मागणी केली आहे. राजभर यांनी आंदोलन करणाऱ्या शेतकरी नेत्यांना अतिरेकी असेही म्हटलेय.

तीन कृषी कायदे मागे घेण्यात आले आहेत. मात्र, याचा शेतकऱ्यांना तोटा होणार आहे. कृषी कायदे रद्द झाल्याचा फायदा खलिस्तानी गुंडांना होणार आहे, असं वक्तव्य हरिनारायण राजभर यांनी केलं आहे. सरकारच्या मवाळ भुमिकेचा शेतकरी नेत्यांनीच फायदा घेतलाय. दिल्लीतील आंदोलक हे शेतकरी नाहीत, असेही राजभर यावेळी म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button