राजकारण

हृदयात अखंड शिवरायांचे स्थान, कोरोनाच्या लढाईत मास्क हीच आपली ढाल : उद्धव ठाकरे

मुंबई – राज्यभर शिवजयंतीचा उत्साह पाहायला मिळत असून शिवाजी महाराजांना वंदन करण्यात येत आहे. ठिकठिकाणी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. राज्य सरकारकडून शिवनेरीवर छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव साजरा करण्यात येत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, अजित पवार, छत्रपती संभाजीराजेही उपस्थित असून शिवप्रेमींचा उत्साह शिगेला आहे. “मनात, ह्रदयात अखंड शिवरायांचे स्थान आहे. त्यांना वंदन करण्यासाठी शिवजयंतीची गरज नाही. प्रत्येक चांगल्या कामात शिवरायांचे स्मरण नकळत होत राहते” असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराजांना वंदन केलं आहे.

“कोरोनाच्या लढाईत मास्क हीच आपली ढाल” असल्याचं म्हणत मुख्यमंत्र्यांनी जनतेला मास्क वापरण्याचं आवाहन देखील केलं आहे. “शिवनेरीवर येण्याचे हे दुसरे वर्ष आहे. हा बहुमान शिवरायांच्या आशीर्वाद आणि आपल्या सर्वांच्या प्रेमाने लाभला आहे. सध्या वातावरण चांगले आहे पण तोंडावर मास्क आहे. कोरोनाशी आपली लढाई सुरू आहे. छत्रपतींनी ज्या काही लढाया केल्या त्यात त्यांनी शत्रूला पराभूत केले. त्यांच्या ढाल तलवारी आज नसल्या तरी कोरोना या शत्रूशी लढाई करताना मास्क ही आपली ढाल आहे, हे विसरू नका” असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.

“छत्रपती दैवत का आहेत,तर लढण्यासाठी तलवार पकडण्याची जिगर त्यांच्यात होती. कोरोनाशी लढताना ही प्रेरणा व जिद्द आम्हाला मिळते आहे. पुरस्कारप्राप्त शिवभक्तांचे अभिनंदन. आपल्या सगळ्यांना जोडणारे शिवराय आहेत. संपूर्ण जगात शिवरायांचे तेज पसरवणार” असं देखील मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त दरवर्षी शिवनेरी किल्ल्यावर अनेक शिवप्रेमी जमत असतात. राज्यभरातून शिवज्योत घेऊन शिवभक्त शिवनेरी किल्ल्यावर जातात. मात्र यंदा कोरोनामुळे सरकारने किल्ल्यावर जास्त गर्दी होऊ नये यासाठी तयारी केली आहे. काही मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत शिवनेरी शिवजयंती उत्सव साजरा केला जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button