राजकारण

हरियाणामधील खट्टर यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकार संकटात

विरोधक आणणार अविश्वास प्रस्ताव

चंदिगड – गेल्या तीन महिन्यांपासून सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे केंद्रातील मोदी सरकारच्या नाकी नऊ आणले आहे. केंद्र सरकारने पारित केलेल्या कृषी कायद्यांविरोधात होत असलेल्या आंदोलनाचा फटका भाजपाला पंजाब, पश्चिम उत्तर प्रदेश आणि हरियाणामध्ये बसत आहे. काही दिवसांपूर्वी पंजाबमध्ये झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत दारुण पराभव झाल्यानंतर आता हरियाणामधील भाजपा सरकार संकटात सापडले आहे. हरियाणामधील मनोहरलाल खट्टर यांच्या नेतृत्वाखालील सरकारने जनतेचा विश्वास गमावल्याचा दावा करत विरोधकांनी या सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव आणण्याची तयारी सुरू केली आहे.
शेतकरी आंदोलन तीव्र होत असतानाच हरियाणामध्ये राजकारणही तापले आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते भूपेंद्र सिंह हुड्डा यांनी राज्यातील मनोहरलाल खट्टर सरकारविरोधात आघाडी उघडली आहे. हुड्डा म्हणाले की, राज्यातील सरकारने जनतेचा विश्वास गमावला आहे. त्यामुळे काँग्रेस या सरकारविरोधात विधानसभेत अविश्वास प्रस्ताव आणणार आहे. खट्टर सरकारमधील मित्रपक्षाचे आमदारच हे सरकार सर्वात भ्रष्ट असल्याचे सांगत आहेत.
मनेहरलाल खट्टर सरकारला पाठिंबा देणाऱ्या दोन अपक्ष आमदारांनी या सरकारला दिलेला पाठिंबा काढून घेतला आहे. तसेच भाजपा-जजपा आघाडीतील काही आमदारच हे सर्वात भ्रष्ट सरकार असल्याचे सांगत आहे, असा टोला भूपेंद्र सिंह हुड्डा यांनी लगावला आहे.

दरम्यान, हरियाणामध्ये काँग्रेस पक्षाने कृषी कायद्यांवरून भाजपाविरोधात आंदोलन सुरू केले आहे. सोनीपतमधील पुरखास गावात राज्यसभा खासदार आणि काँग्रेस नेते दीपेंद्र हुड्डा यांनी रविवारी शेतकऱ्यांची महापंचायत आयोजित केली होती. यावेळी त्यांनी भाजपा सरकारवर जोरदार टीका केली होती. तसेच जेव्हापासून देशात भाजपाचे सरकार आले आहे. तेव्हापासून देशातील जनता त्रस्त झालेली आहे. वाढत्या महागाईने देशातील जनतेचे कंबरडे मोडले आहे, अशी टीका त्यांनी केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button