हक्कभंग समितीसमोर मंगळवारी हजर राहा; अर्णब गोस्वामींच्या अडचणीत वाढ

मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह राज्य सरकारचा अवमानकारक उल्लेख केल्याप्रकरणी रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. अर्णब यांच्याविरोधात हक्कभंग प्रस्ताव विधानसभेत मांडण्यात आला होता आणि त्यांना बुधवारी (३ मार्च) हक्कभंग समितीसमोर हजर राहण्यासाठी समन्स बजावण्यात आला आहे. अर्णब यांना याआधी हक्कभंग समितीसमोर हजर राहण्यासाठी नोटीस बजावण्यात आली होती. परंतु, ते गैरहजर राहिले होते. त्यामुळे आता हक्कभंग समितीने अर्णब यांना समन्स बजावले आहे. त्यामुळे आता ते हक्कभंग समितीसमोर हजर राहणार की नाही, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
मुख्यमंत्री, गृहमंत्री आणि विधिमंडळाचा अवमान केल्याने अर्णब यांच्याविरोधात मागील वर्षी ९ ऑगस्टला विधानसभेत हक्कभंगाचा प्रस्ताव मांडण्यात आला होता. शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी हा ठराव मांडला होता. त्याला अर्णब यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. तसेच हक्कभंग समितीसमोर हजर राहण्यासाठी नोटीस बजावण्यात आल्यानंतरही ते गैरहजर राहिले होते.