स्टेडियमला स्वत:चे नाव देणाऱ्या मोदींचा संजय राऊतांकडून शेलक्या शब्दात समाचार

मुंबई – जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम असा लौकिक मिळवणाऱ्या अहमदाबादमधील मोटेराचे नामकरण नरेंद्र मोदी स्टेडियम असे करण्यात आले आहे. दरम्यान, या नामकरणावरून आता जोरदार राजकारण पेटले आहे. सरदार पटेलांचे नाव वगळून स्वत:चे नाव देण्याच्या निर्णयावरून नरेंद्र मोदींवर विरोधक सडकून टीका करत आहेत. आता शिवसेना नेते संजय राऊत यांनीही स्टेडियमला नरेंद्र मोदींचे नाव देण्याच्या निर्णयाचा समाचार घेतला आहे.
संजय राऊत म्हणाले की, अशा निर्णयांबाबत एखादा राजकीय पक्ष किंवा सरकार फार काही बोलू शकत नाहीत. प्रत्येक राज्यात अनेक नेत्यांची नावे अशा प्रकारे दिली जातात. आता स्टेडियमला नाव देण्यास त्या राज्यातील सरकार आणि क्रिकेट संघटनेने मान्यता दिली आहे. मात्र मोदी आता मोठे नेते झाले आहेत. त्यामुळे मोदी आता सरदार पटेल यांच्यापेक्षा मोठे वाटू लागले आहेत, असा घणाघात संजय राऊत यांनी केला आहे.
दरम्यान, जगातील सर्वात मोठं स्टेडियम असा लौकिक मिळवणाऱ्या या स्टेडियमचे औपचारिक उदघाटन काल राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याहस्ते झाले. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत, क्रीडामंत्री किरेन रिजिजू आणि बीसीसीआयचे सचिव जय शाह उपस्थित होते. आतापर्यंत मोटेरा या नावाने ओळखल्या जाणाऱ्या स्टेडियमचे आता नामांतर करण्यात आले असून, या स्टेडियमला पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नाव देण्यात आले आहे. त्यामुळे आता मोटेरा स्टेडियम नरेंद्र मोदी स्टेडियम या नावाने ओळखले जाणार आहे.