Top Newsराजकारण

अमरावतीत दुसऱ्या दिवशीही तोडफोड-जाळपोळ; संपूर्ण जिल्ह्यात चार दिवस संचारबंदी, इंटरनेट सेवाही बंद

अमरावती: गेल्या दोन दिवसांपासून अमरावतीत सुरू असलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण शहरात चार दिवसांसाठी संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तसेच या काळात शहरातील इंटरनेट सेवाही बंद ठेवण्यात येणार आहे. या शिवाय अफवा पसरविणाऱ्यांवर कठोर कारवाईही करण्यात येणार आहे.

आज भाजपने बंदची हाक दिली होती. आज सकाळी राजकमल चौकात प्रचंड मोठा जमाव जमा झाला आणि त्यांनी प्रचंड तोडफोड करण्यास सुरुवात केली. त्यामुळे परिस्थिती आणखीनच चिघळली होती. सध्या अमरावतीत तणावपूर्ण शांतता आहे. मात्र, परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून जिल्ह्यात चार दिवसांसाठी संचारबंदी लागू करण्यात आली आहे. यावेळी निदर्शकांनी जबरदस्त राडा केला. हे थांबवण्यासाठी पोलिसांनाही लाठीचार्ज करावा लागला. भाजप आणि समविचारी पक्षानी शनिवारी पुकारलेला हा बंद कडकडीत पाळला गेला. यावेळी राजकमल चौकात आंदोलकांनी धुमाकूळ घातला. कार पेटवली, प्रतिष्ठानाची जाळपोळ करण्यात आली. काही धार्मिक स्थळाचे नुकसानही यावेळी करण्यात आले. यानंतर पोलीस प्रशासनाने अमरावतीत कर्फ्यु लागू केला आहे. जिल्हाधिकारी पवनीत कौर यांच्या अध्यक्षतेखाली सर्व पक्षीय बैठकही घेण्यात आली आहे.

लालखडी परिसर, चांदनी चौक, पठान चौक भागात आज सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास अमरावती बंदला हिंसक वळण मिळाले.एवढेच नाही, तर नमुना गल्ली भागात तलवारी घेतलेले युवक घोषणाबाजी करीत होते, असेही समजते. या संपूर्ण परिसरात तणावपूर्ण वातावरण असून कडक पोलीस बंदोबस्त आहे.

दरम्यान, आज सलग दुसऱ्या दिवशी अमरावती पेटले. अमरावतीत सकाळपासूनच जमावाकडून जोरदार दगडफेक सुरू आहे. अमरावतीत राजकमल चौकात तोंडाला रुमाल लावून आलेल्या काही आंदोलकांनी हातात विटा घेऊन दुकानांच्या दिशेने फेकल्या. तर काही तरुणांनी दगडांनी दुकाने फोडले. काही तरुणांनी तर थेट रुग्णालयाला लक्ष्य केलं. या तरुणांनी रुग्णालयाच्या दिशेने दगडफेक केली. पोलिसांनी या जमावाला पोलिसांनी पांगवण्याचा प्रयत्न केला असता जमावासोबत पोलिसांची बाचबाची झाली. त्यामुळे पोलिसांना काही लाठीमार करावा लागला. मात्र, जमाव प्रचंड असल्याने त्यांना नियंत्रित करणं अशक्य होत होतं. शिवाय पोलिसांची कुमकही कमी असल्याने जमावाला पांगवताना पोलिसांची दमछाक होत होती. तब्बल तासभर हा थरार सुरू होता.

त्रिपुरा राज्यात मशीद जाळल्याच्या कथित घटनेनंतर अमरावतीमध्ये मोर्चाला हिंसक वळण लागल्यानंतर येथे दगडफेक आणि जाळपोळीच्या घटना घडल्या. या पार्श्वभूमीवर अमरावतीला शांत करण्यासाठी बुलडाणा, यवतमाळ, वर्धा, वाशीम जिल्ह्यातून पोलिसांची कुमक मागवण्यात आली आहे. त्रिपुरा येथे एका मिशिदीला जाळण्यात आल्याचे कथित वृत्त संपूर्ण राज्यभर वाऱ्यासारखे पसरले. या वृत्तानंतर नांदेड, मालेगाव अशा शहरात मुस्लीम बांधवांचे मोठे मोर्चे निघाले. अमरावतीतदेखील मोठा मोर्चा काढण्यात आला. मात्र या मोर्चाला समोर हिंसक वळण लागले. १२ नोव्हेंबर रोजी काही आंदोलकांनी बळाचा वापर करुन दुकाने बंद करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर काही ठिकाणी दगडफेकीच्यादेखील घटना घडल्या. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना बळाचा वापर करावा लागला.

बंदच्या पार्श्वभूमीवर काही तोडफोडीच्या घटना घडल्या. त्यानुसार फौजदारी दंड प्रक्रिया संहितेच्या कलम १४४ (१), (२), (३) अन्वये पोलीस आयुक्त कार्यालयाकडून संचारबंदी आदेश लागू करण्यात आला आहे. अमरावती शहरात कोणताही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी संचारबंदी लागू करण्यात येत आहे, असं प्रभारी पोलीस आयुक्त संदीप पाटील यांनी आदेशात नमूद केले आहे.

संचारबंदी कालावधीत कोणीही व्यक्ती वैद्यकीय कारण वगळता इतर कारणासाठी घराबाहेर पडणार नाही तसेच, पाचपेक्षा जास्त इसम एकत्रित जमणार नाहीत, तसेच कोणत्याही प्रकारच्या अफवा प्रसारित करू नयेत. या आदेशाचा भंग करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीने भारतीय दंड संहितेच्या कलम 188 अन्वये शिक्षा पात्र अपराध केला आहे असे मानण्यात येईल. तसेच त्यानुसार कारवाई करण्यात येईल. हा आदेश आजपासून संपूर्ण अमरावती शहरासाठी पुढील आदेशापर्यंत लागू राहील, असे आदेशात नमूद आहे.

सलग दुसऱ्या दिवशी तणावाचे वातवरण

आजदेखील अमरावती शहर धुमसतच आहे. येथे आज सलग दुसऱ्या दिवशी सकाळापासून जमावाकडून दगडफेक सुरु आहे. काही आंदोलकांनी हातात विटा घेऊन दुकानांच्या दिशेने फेकल्या. तर काही तरुणांनी दगडांनी दुकाने फोडले. काही तरुणांनी तर थेट रुग्णालयाला लक्ष्य केलं. जमावाला पोलिसांनी पांगवण्याचा प्रयत्न केला असता जमावासोबत पोलिसांची बाचबाची झाली. त्यामुळे पोलिसांना काही लाठीमार करावा लागला. मात्र, जमाव प्रचंड असल्याने त्यांना नियंत्रित करणं अशक्य होत होतं. शिवाय पोलिसांची कुमकही कमी असल्याने जमावाला पांगवताना पोलिसांची दमछाक होत होती.

दंगल पेटवण्यामागे भाजपचे षडयंत्र; जनतेने बळी पडू नये : नाना पटोले

उत्तर प्रदेशसह पाच राज्यात विधानसभेच्या निवडणुका लवकरच होत आहे. दंगली पेटवून निवडणुकीत त्याचा फायदा घेण्याचा भाजपचा नेहमीप्रमाणे डाव आहे. म्हणूनच त्रिपुरा घटनेच्या आडून महाराष्ट्रात दंगली पेटवून त्यावर उत्तर प्रदेशात आपली राजकीय पोळी भाजण्याचे भारतीय जनता पक्षाचे षडयंत्र आहे असा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.

यावेळी पटोले म्हणाले की, भाजपच्या या षडयंत्राला राज्यातील जनतेने बळी पडू नये, अफवांवर विश्वास ठेवू नये शांतता राखावी, काल आणि आज अमरावतीसह काही भागात घडलेल्या हिंसक घटनांचा तीव्र निषेध आहे. महाराष्ट्रात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना यांचे सरकार दोन वर्षापासून स्थिर असून भाजपने हे सरकार अस्थिर करण्यासाठी खूप प्रयत्न केले पण यात त्यांना यश आले नाही. महाराष्ट्रात अशांतता पसरवून सरकार पाडण्याचे सर्व प्रकारचे उद्योग झाले त्यात महागाई, बेरोजगारी, ढासळती अर्थव्यवस्था, चीनची घुसखोरी, शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून देशभर भारतीय जनता पक्षाच्याविरोधात तीव्र असंतोष आहे असं त्यांनी सांगितले.

मुख्य मुद्यापासून जनतेचे लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी भाजपाकडून असे षडयंत्र केले जात आहे. हिंसक कारवाया करणाऱ्यांवर व अफवा पसरवणाऱ्यांवर सरकारने कारवाई करावी. समाजातील दोन घटकांमध्ये तेढ निर्माण करुन त्यावर आपली राजकीय पोळी भाजण्याचे राजकारण करणे हा भारतीय जनता पक्षाचा इतिहास राहिला आहे. देशातील ज्वलंत प्रश्नावर जनतेच्या आक्राशोला त्यांना तोंड देता येत नाही. तर जनतेमध्ये भाजपा व मोदी सरकारविरोधात प्रचंड असंतोष आहे. या असंतोषाचा फटका उत्तर प्रदेशसह पाच राज्यातील आगामी विधानसभेच्या निवडणुकीत बसू नये म्हणून दंगली पेटवून मतांचे ध्रुवीकरण करण्याचा भाजपाचा डाव आहे. महाराष्ट्रातील जनतेने भारतीय जनता पक्षाचा हा कुटील हेतू ओळखून षडयंत्राला बळी पडू नये, राज्यात शांतता राखावी, असं आवाहन प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button