मुक्तपीठ

सेलिब्रिटी खेळवा, शेतकरी लोळवा

ज्ञानेश महाराव, संपादक, साप्ताहिक चित्रलेखा

 ‘वसुधैव कुटुम्बकम्’, ‘हे विश्वची माझे घर’, अशी पसायदानी जपमाळ ओढणाऱ्यांची सत्ता देशात आहे. पण  खोपडीत कमालीची संकुचितता असल्याचं प्रदर्शन ते सातत्याने घडवत असतात. दळणवळण आणि दूरसंचार यांच्या सुविधा सार्वत्रिक होऊ लागल्या तेव्हापासून देशांच्या सीमा आपोआप ढिल्या पडू लागल्या. जग अधिक जवळ आलं. भौगोलिक अंतराचं महत्त्व संपलं. ‘फेसबुक- ट्विटर’ यासारख्या क्षणात व्हायरल होणाऱ्या ‘सोशल मीडिया’मुळे सामान्य माणूसही त्याचे म्हणणे, त्याच्या भावना जगाच्या कुठल्याही टोकापर्यंत पोहोचवू शकतो. हे वास्तव लक्षात घेतलं की, दिल्लीतल्या सीमेवर सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या ऐतिहासिक आंदोलनाबाबत जगातल्या कुठल्याही भागातील- देशातील व्यक्तीने मत व्यक्त करणं गैर ठरत नाही, हे स्पष्ट होतं. मग मत व्यक्त करणारी व्यक्ती ‘पॉप सिंगर’ असो वा ‘पॉर्नस्टार’! मत व्यक्त करण्याचा अधिकार माणूस म्हणून प्रत्येकाला आहे. ते मत चुकीचं असेल तर त्यावर जरूर टीका व्हावी. ते मत सप्रमाण खोडूनही काढावं. पण ‘मेरे अंगने में तुम्हारा क्या काम है!’ असं टाळ्या पिटत कुणाला कुणाला जाब विचारणे, ट्रोल करणे वा तसं कुणाकडून करवून घेणे, हे शहाणपणाचं  नाही.
     पण हा नको तो उद्योग लता मंगेशकर, सचिन तेंडुलकर या ‘भारतरत्नां’प्रमाणे काही क्रिकेटपटू व सिने कलावंतांकडून घडला. ‘मोदी सरकार’ने ‘कोरोना लॉकडाऊन’च्या काळात ‘कृषी सुधारणा’चे तीन कायदे संसदेत घाईगडबडीत मंजूर करून घेतले. ‘ते रद्द व्हावेत’ ही मागणी घेऊन पंजाब, हरियाणा, उत्तराखंड या राज्याचे शेतकरी गेले तीन महिने दिल्लीच्या सीमेवर ठाण मांडून आहेत. त्यांना अन्य राज्यातल्या शेकडो शेतकरी संघटनांचीही साथ मिळालीय. या संघटनांच्या नेत्यांच्या सरकारबरोबर चर्चेच्या उठा-बश्या सुरू आहेत. शेतकरी आणि त्यांच्या नेत्यांचा निर्धार पक्का आहे. त्यांना ‘मोदी सरकार’ने नवीन शेती कायदे रद्द   केल्यानंतरच घरी परतायचं आहे. या निर्धारामुळे बैठकांच्या मालिकेने थकलेले- दमलेले सरकार आपली सत्ता ताकद वापरून शेतकरी आंदोलनाला हरप्रकारे मोडून काढण्याचा प्रयत्न करीत आहे. आंदोलकांना ‘मीडिया’मार्फत बदनाम करीत आहे. त्यासाठी  शेतकरी आंदोलकांना ‘दहशतवादी’, ‘खलिस्तानवादी’ अशी दूषणं दिली गेली. प्रजासत्ताक दिनी तिरंग्याचा वापर करण्यात आला. आंदोलक शेतकर्‍यांच्या अंगावर ‘कथित देशप्रेमी’ सोडण्यात आले. तरीही आंदोलक शेतकरी टिकून राहिलेत. त्यांना मिळणारा पाठिंबा वाढता राहिलाय.
      ‘मोदी सरकार’च्या शेतीविषयक नव्या कायद्यांबाबत मतभिन्नता असू शकते. कुणाला ते कायदे योग्य आणि शेतकरी हिताचे वाटू शकतात. काहींना या विरुद्धही वाटू शकते. म्हणून नव्या कायद्यांना विरोध करणाऱ्यांना सरकार वा देशविरोधी ठरवणे साफ चुकीचं आहे.  किंबहुना, कायद्यांना विरोध करणाऱ्यांचा सरकारवर, लोकशाहीवर विश्वास आहे, म्हणून ते आपली मागणी सरकार दरबारी सादर करतात. त्यासाठी मोर्चे-धरणे आंदोलन करतात. त्याच सनदशीर मार्गाने शेतकरी आंदोलन करीत असताना त्यांना बदनाम करण्याचं कारण काय ? त्यांना अमानुष वागणूक का दिली जातेय ? त्यांच्या बाजूने बोलणाऱ्यांना ‘आंदोलनजीवी’ असे का हिणवता? असे प्रश्न ‘देशी’ सेलिब्रिटींनी ‘मोदी सरकार’ला विचारले पाहिजे होते.
      तथापि, ‘आंदोलक शेतकऱ्यांचा सन्मान राखा,’ अशा आशयाचे ‘ट्वीट’ पॉप सिंगर रिहाना आणि पर्यावरणवादी कार्यकर्ता ग्रेटा थनबर्ग यांनी करताच, देशी सेलिब्रिटींना राष्ट्रीय कर्तव्याची जाग आली. लता मंगेशकर, सचिन तेंडुलकर या ‘भारतरत्नां’सह करण जोहर, एकता कपूर, अजय देवगण, सुनील शेट्टी, कैलाश खेर, गौतम गंभीर, विराट कोहली आदि  सेलिब्रिटींनी रिहाना आणि ग्रेटाच्या विरोधात ‘ट्वीट’ केले. त्यांचं म्हणणं ”शेतकरी आंदोलन हा भारताचा अंतर्गत प्रश्न आहे. तो आमचा आम्ही सोडवू. तुम्हाला त्यात पडायचं काम नाही !”
     सेलिब्रिटी म्हणवणारी ही मंडळी खेळात, अभिनयात, गाण्यात कितीही कुशल असली, तरी त्यांचा ‘कंठ कोकिळेचा आणि मेंदू पोपटाचा’ असा प्रकार असतो. त्यांची गोड गळ्याची पोपटपंची लोकांना भावते. पण ती उपरी असते. त्यामुळेच या देशी सेलिब्रिटींचे ‘ट्वीट’ जवळपास सारखंच होतं. त्यांचं स्क्रिप्टिंग ‘केंद्र सरकार’च्या भूमिकेशी मिळतंजुळतं झालं. म्हणूनच ‘मनसे’प्रमुख राज ठाकरे यांनी, ”अशा वादात सेलिब्रिटींना टाळता आलं पाहिजे होतं,” अशी ‘मोदी सरकार’ची कानउघाडणी केली. ”नवे कृषी कायदे हा सरकारी धोरणाचा विषय आहे. ते काही देशापुढचं संकट नाही ! आणि लता मंगेशकर, सचिन तेंडुलकर ही तर खूप मोठी माणसे आहेत !” असो. ह्या भारतरत्नांचे मोठेपण नाकारलं कुणी ? पण त्यांचं मोठेपण त्यांना समजलं पाहिजे ना !
      सचिन तेंडुलकर श्रद्धाभावाने ‘चमत्कारिक’ सत्यसाईबाबा पुढे लोटांगण घालणार आणि लतादीदी ह्या बाबासाहेब पुरंदरे यांच्यासह लाखाच्या पुरस्कारासाठी भोंदू नरेंद्र महाराजपुढे झुकणार ! समाजाला प्रगतीची दिशा दाखवणारे यांचे कार्य काय ? अन्याय, अत्याचार, अमानुषता यांच्याविरोधात लढणाऱ्यांना   हिंमत देण्यासाठी यांनी कधी दोन-चार शब्द खर्च केलेत का? ”तुमचे प्रश्न आम्ही सोडवतो,” असे ज्यांनी कधी भारतवासीयांना आश्वासन दिले नाही, ते ”आमच्या देशातले आम्ही पाहू !” असे विदेशींना कोणत्या तोंडाने ऐकवू शकतात ?
*रत्नांचा धोका, मोदींचा मोका*
     रत्नं ही सोन्या-चांदीसारखीच किमती असतात. त्याने श्रीमंतीचं वैभवाचं दर्शन घडतं. पण त्याने बाळगणाऱ्यांच्या भुकेचे प्रश्न सुटत नाहीत, तर इतरांचं काय ? ह्या रत्नांत आणि दगड, धातूच्या देव- देवता ह्यांत काडीचाही फरक नाही. कोकिळा पोटासाठी ओरडते; पण आपल्याला ती ‘गाते’, असं वाटतं. हा फरक ज्यांना कळतो, ते कुणाच्या ‘सेलिब्रिटी’पणाला फसत नाहीत. ते वास्तव समजून घेतात.
      अमेरिकेचे राष्ट्राध्यक्षपद गेल्यावर डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांच्या समर्थकांनी लोकशाहीच्या सर्वोच्च स्थानाला कलंक लावणारा जो धिंगाणा केला त्याविरोधात सडकून लिहितात- बोलतात. तेव्हा ‘ही आमची अंतर्गत बाब आहे,’ असे कुणा अमेरिकनाने भारतीयांना सुनावलं नाही. कारण अशा अनुचित प्रसंगाबद्दल तुमच्या भावना काय आहेत, त्या तुम्ही कशा प्रकारे व्यक्त करतात, ते महत्त्वाचं आहे. त्यातून तुमच्या माणूसपणाचे, बुद्धी- शक्तीचे दर्शन घडते. पाकिस्तानातील एका १४ वर्षांच्या मुलीवर ‘तालिबानी’ संघटनेने हल्ला केला. तेव्हा त्या हल्ल्याचा निषेध जगभरातून झाला. त्याने त्या मुलीला बळ मिळालं. मलाला युसुफसाई तिचे नाव ! तिने तालिबानी धर्मांधांविरोधातला आपला शांतीचा लढा चालू ठेवला. त्याबद्दल तिला ‘नोबेल पुरस्कार’ने सन्मानित करण्यात आलं.
     यावरून स्पष्ट होतं की, आता कोणतीही बाब ही कोणत्याही देशाची अंतर्गत बाब राहिलेली नाही. इतिहास- वर्तमानातल्या अनेक खर्‍या-खोट्या गोष्टी आता उघड होत आहेत. खाजगी म्हणून अशी कोणतीही गोष्ट राहिलेली नाही. जे दिसतं, ऐकायला, वाचायला मिळतं; त्यावर जगातली कोणीही व्यक्ती आपलं मत व्यक्त करणारच! ‘मी बोका असल्याने, डोळे मिटून दूध पितो. तुम्हीही डोळे मिटा,’ अशी अपेक्षा आता कुणी ठेवू शकत नाही. म्हणूनच कुणी दखल घेवो न घेवो लोक आपलं मत ‘सोशल मीडिया’तून जाहीरपणे व्यक्त करतात.
      ज्याची नियत साफ असते, तो अशा मतं-प्रतिक्रियांची दखल घेत नाही. ‘कर नाही, तर डर कशाला?’ शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देणारी प्रतिक्रिया कॅनडाच्या प्रधानमंत्र्यांनी दिली. तशी आता रिहाना आणि ग्रेटाने दिली. याकडे ‘मोदी सरकार’ला दुर्लक्ष करता का आले नाही ? याकडे लक्ष वेधण्यासाठी ‘भारतरत्न’ व ‘सेलिब्रिटीं’ना का कामाला लावले आणि टीकेच्या तोंडी दिले ? याची उत्तरं ‘भारतीय नागरिक’ म्हणून आपण शोधली पाहिजेत. जे जे घडेल ते ते पहात राहावे, ही हतबलता राष्ट्रहितास घातक ठरणारी आहे. एक गोष्ट आहे.
      एकदा प्रभू येशू जीव खाऊन धावतोय, असं लोकांना दिसलं. त्याला एका शेतकऱ्याने अडवलं आणि विचारलं, ”तू असा वाघ मागे लागल्यासारखा का धावतोस ? तुला एवढी कशाची भीती वाटतेय ? अंधांना दृष्टी देणारा, बहिऱ्यांना श्रवणशक्ती देणारा, मातीचे पक्षी बनवून हवेत उडवणारा, मुडद्यांना कबरीतून उठवून पुन्हा जीवन देणारा येशू तूच आहेस ना ? मग असा भेदरून का पळतोस ?”
     त्यावर येशू म्हणाला, ”तू म्हणतोस, तो मीच आहे. पण एक मूर्ख मला गाठू बघतोय, म्हणून मी असा पळतोय !” त्याचं हे उत्तर शेतकऱ्याला पटलं नाही. तो येशूला म्हणाला, ”अशक्य ते शक्य करणारा तू ! त्या मूर्खाला शहाणं करणं तुला अशक्य आहे का?” येशू   म्हणाला, ” हो, हो, अशक्य आहे मला ! मूर्खाला शहाणं करणं केवळ अशक्य आहे. कारण आंधळ्याला आपल्या आंधळेपणाची; बहिऱ्याला आपल्या बहिरेपणाची जाणीव असते. मुडद्यालाही आपण मेलेलो आहोत, हे कळते. पण मूर्खाला आपल्या मूर्खपणाची जाणीव नसते. तो स्वतःला शहाणाच समजत असतो. त्याला कसा सुधारणार ? त्याच्यापासून दूर पळणं, एवढाच मार्ग आहे !” आपण येशू नाही. पण ‘मोदी है, तो मोका है !’ ह्या प्रधानमंत्र्यांच्या राज्यसभेच्या ताज्या भाषणातल्या शेवटच्या ओळीचा अर्थ समजण्याइतके तरी शहाणे आहोत ना ?
—–3——-
*राणेंच्या गावात, फडणवीसांच्या सूरात*
     कोकणात नारायण राणे यांनी स्थापन केलेल्या ‘चॅरिटेबल ट्रस्ट’द्वारे सुरू करण्यात आलेल्या हॉस्पिटल आणि ‘मेडिकल कॉलेज’चं उद्घाटन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नुकतंच केलं. या हॉस्पिटल-कॉलेजचे हे दुसरे उद्घाटन आहे. अगोदर ज्येष्ठ नेते शरद पवार आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत असाच उद्घाटनाचा कार्यक्रम झाला होता. तो पुन्हा का करण्यात येत आहे, ते समजत नव्हतं. पण या  आताच्या कार्यक्रमाच्या बातम्या पाहिल्यावर कुणाची सोय आणि गैरसोय काय आहे, ते लक्षात येतं. एरव्ही हा कार्यक्रम किरकोळीत मोडला गेला असता. पण अमित शहा यांच्या विधानामुळे सुमारे सव्वा वर्षांपूर्वीच्या शिळ्या आणि आंबलेल्या कढीला ऊत आलाय.
     सव्वा वर्षापूर्वी जेव्हा विधानसभा निवडणुकीचे निकाल लागले. त्याक्षणीच ‘शिवसेना’ आणि ‘भाजप’ या पक्षात मुख्यमंत्री पदावरून वाद उफाळून आला. ‘शिवसेना’चं म्हणणं, २०१९च्या  लोकसभा निवडणुकीच्या वेळेस युतीच्या चर्चेसाठी अमित शहा ‘मातोश्री’ निवासस्थानावर आले होते. त्यावेळी ‘शिवसेनाप्रमुख’ दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या कक्षात अमित शहा, उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत लोकसभा, विधानसभेला लढवायच्या जागा आणि २०१९ च्या विधानसभा निवडणूक निकालानंतर सत्ता आल्यास ‘सत्तेचे समान वाटप’ असं सूत्र ठरलं. त्यात मुख्यमंत्रीपद निम्मे-निम्मे म्हणजे प्रत्येकी अडीच वर्षं आलेच. विशेष म्हणजे, या भेटीनंतर झालेल्या ‘पत्रकार परिषदे’त त्या वेळचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, ‘पदांचे समसमान वाटप’ हे सूत्र ठरल्याचं जाहीर केलं होतं. त्याची ‘क्लिप’ आणि ‘व्हिडिओ लिंक’ उपलब्ध असून ती आजही  फिरत असते.
     याच विषयासंदर्भात अमित शहा यांनी सुमारे सव्वा वर्ष काहीच उघड केलं नव्हतं. ते म्हणायचे, ”खाजगीत किंवा बैठकीत जे काही ठरलेले असते, ते उघड करण्याची आमची परंपरा नाही.” ज्यावेळी म्हणजे २०१९ च्या ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात जेव्हा ‘शिवसेना’ आणि ‘भाजप’ या पक्षात मुख्यमंत्रीपदावरून सत्ता स्थापन करायचे घोडे अडले होते;  तेव्हाही अमित शहा या विषयावर काहीच बोलले नव्हते. आता बोलले. त्याचा स्पष्ट अर्थ असा आहे की, ‘भाजप’ची ‘शिवसेना’शी पुन्हा  युती करण्याची शक्यता आता संपली आहे!’ बदललेल्या राजकीय परिस्थितीत ‘भाजप’प्रणित ‘राष्ट्रीय जनतांत्रिक गठबंधन’ म्हणजेच ‘एनडीए’तील प्रमुख पक्ष ‘भाजप’ला सोडून गेलेत. रामदास आठवले यांचा ‘रिपब्लिकन पक्ष’, जीतनराम मांझी यांचा ‘हिंदुस्थान आवाम मोर्चा’ यांच्यासारखे किरकोळ पक्षच आता ‘भाजप’चे सहकारी पक्ष म्हणून उरलेत. त्यांचा मित्र असणारा सर्वात मोठा पक्ष ‘शिवसेना’ आणि त्या खालोखाल ‘अकाली दल’ त्यांना सोडून गेलाय.
       बिहारमध्ये त्यांच्याबरोबर नितीशकुमार यांचा ‘जेडीयू’ हा पक्ष आहे. तोच मोठा म्हणावा,  असा पक्ष ‘भाजप’ बरोबर आहे. म्हणजे इथून पुढची वाटचाल ‘भाजप’ला स्वबळावरच करायची आहे. त्यासाठी राज्या- राज्यात जे मित्र पक्ष होते; त्या ‘तृणमूल काँग्रेस’पासून ‘शिवसेना’पर्यंत प्रत्येकाशी त्यांचा संघर्ष सुरू आहे. ज्या भाषेत आणि ज्या पद्धतीने त्यांचा पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्याबरोबर संघर्ष सुरू आहे; नेमकं तेच आणि तसंच त्यांना महाराष्ट्रात करायचं आहे. ‘ज्याचा झेंडा महाराष्ट्रात उभा राहतो, त्याचा देशात फडकतो!’ अशी आतापर्यंतची ‘राष्ट्रीय वहिवाट’ असल्यामुळे आणि असा महाराष्ट्र बघता बघता, गमतीत हातातून गेल्याने आपण काय गमावलं यांचं भान ‘भाजप’च्या राष्ट्रीय नेतृत्वाला आलेलं आहे. त्यामुळेच ज्याप्रमाणे राणे यांच्या ‘ट्रस्ट’च्या ‘मेडिकल कॉलेज’चं दुसऱ्यांदा उद्घाटन झालं; त्याचप्रमाणे देवेंद्र फडणवीस गेली सव्वा वर्ष जे म्हणत होते की, ‘मुख्यमंत्रीपदाचे अर्धे-अर्धे वाटप ठरलेच नव्हते,’ त्याचेच रिपिटेशन- पुनरुच्चार अमित शहा यांनी केलाय.
      गेल्या सव्वा वर्षात फडणवीस आणि नारायण राणे यांनी दर तीन महिन्यांचे ‘अल्टिमेटम’ देऊन ज्योतिषशास्त्र खोटं असल्यावर शिक्कामोर्तब केलं. ‘अमुक महिन्याच्या अखेरीस हे सरकार कोसळेल’, ‘हे सरकार स्वतःच्या ओझ्याने कोसळेल’, असा त्यांचा दावा होता. सुशांत सिंह प्रकरण, ईडी, सीबीआय, ‘कोरोना’काळ अशी विविध कारणं देऊन वातावरण निर्मिती केली. पण ‘भाजप’चा प्रत्येक डाव फुसका ठरलाय. १९९९ साली राज्यात ‘काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस’चं सरकार आलं. त्यांच्यात सतत वाद होत असत. त्यावरून तेव्हाचे ‘शिवसेना-भाजप’ युतीचे नेते ‘हे सरकार कोसळेलच बघा,’ असं सतत सांगत होते. आता राज्यात सत्तेवर असलेल्या ‘महाविकास आघाडी’च्या ठाकरे सरकारमध्येही वाद आहेत. अंतर्विरोध आहेत.
      पण सरकार कोसळण्याची शक्यता १९९९-२०१४ पर्यंतच्या ‘काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी’च्या सत्तेसारखीच कमी आहे. समान गरजेतून मिळालेली सत्ता कोण सोडेल? परिणामी, सरळ संघर्षाला पर्याय नाही. म्हणूनच शहा यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या भाव -सुरात पहिल्यांदाच सूर मिसळलाय.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button