फोकस

सांस्कृतिक पुण्याची ओळख बदलतेय का?

- अ‍ॅड. योगिनी बाबर

विद्येचे माहेरघर, सांस्कृतिक पुणे अशी बिरुदावली मोठ्या सन्मानाने मिरवणाऱ्या पुणे शहराची ओळख आता गुंडागर्दीचे, गुन्हेगारांचे माहेरघर अशी रुढ होवू लागली आहे. एक शांतताप्रिय, बु्िदधजीवी शहर अशा पद्धतीने गु्न्हेगारांच्या आहारी जाणे थांबवण्यासाठी प्रत्येक पुणेकरांनी सक्रियतेने याचा विरोध केला पाहिजे. ही गोष्ट स्पष्टच आहे की, या सर्वच गुन्हेगारांना कोणत्या ना कोणत्या राजकीय पक्षांचा आधार आहे, राजकीय महत्वाकांक्षा आणि आर्थिक सहकार्याशिवाय कोणीही भाईगिरी, दादागिरी करीत नाही हे सत्य आहे. किंबहूना अशाच कुठल्या तरी भाई दादांचे आपल्याकडे लक्ष वेधण्यासाठी हल्ली पुणे, पिंपरी, चिंचवडमधील गल्लीबोळातील नवजात दादा, भाईंकडून तलवारीने केक कापणे, छोट्या मोठ्या गॅंग बनवून दहशत माजवणे, रात्री अपरात्री पार्कींगमधील वाहनांची मोडतोड करणे आदी घटना सर्रास दिसू लागल्या आहेत.
कोरोना काळात जसजसे लॉकडाउन सुरु झाले, तसतशी अनेकांची काळया पैशाची आवक थांबली आणि अचानकच पुणे शहर, पिंपरी, चिंचवड परीसरात गुन्ह्यांची संख्याही वाढली, अगदी सायबर गुन्ह्यांपासून ते मोेबाईल चोरी, एटीएम फोडणे, मंगळसूत्र हिसकावणे, बँकेच्या बाहेर थांबून वृद्धांकडील पैसे लुटणे, अशा गुन्हेगारांच्या टोळ्याच सक्रिय झाल्या. विशेष म्हणजे या सर्व गुन्हेगारांत अल्पवयीनांची संख्या मोठी आहे. याच कालावधीत सैराट फेम प्रेमाची अनेक उदाहरणेही समोर आली, तर अल्पवयीन मुलींच्या गर्भपाताची, लैगिंक शोषणाच्या घटनांतही वाढ झाली. लॉकडाउन काळात पुण्यात विविध ठिकाणी दोन गटात, पूर्ववैमनस्यातून आठ ते दहाजणांचा निर्घृणपणे खून करण्यात आला आहे. पुण्यातले हे हत्यासत्र राजकीय पक्षांशी सबंधित असल्याने अधिकच खळबळ माजवणारे ठरले होते.
कोरोनाकाळात देशभरातील सात वर्षापेक्षा कमी शिक्षा भोगत असणाऱ्या आणि किरकोळ गुन्ह्यात तुरुंगात असणाऱ्या कैद्यांना नियमांसह पॅरोलवर घरी पाठवण्यात आले होते. पुण्यात या निर्णयामुळे जवळपास 300 च्या आसपास गुन्हेगार घरी परतले, त्यापैकी जवळपास 30 टक्के गुन्हेगारांनी आपल्या परीसरांत येताच पुन्हा दहशत माजवण्यास सुरुवात केली, गुन्हे केले, म्हणून त्यांना परत तुरुगांत धाडण्यात आले आहे. कोरोनामुळे उद्भवलेली आर्थिक विवंचना, बेकारी, स्थलांतरीत होण्यावर आलेले निर्बंध, हाताला काम नाही या कारणाने गुन्हेगारांकडेच आश्रय घेणाºया अल्पवयीनांचा एक नवा समूह तयार होताना दिसून येतो आहे. यातही ज्या गुडाना राजकीय आश्रय आहे, अशांमागे तरुण वेडयासारखे धावताना दिसतात. नुकतेच पुण्यातील दोन कुख्यात गुन्हेगार शरद मोहोळ आणि गज्या मारणे यांनी तुरुगांतून मुक्तता झाल्यानंतर तुरुंगाच्या गेटपासून ते स्वताच्या घरापर्यंत हजारो तरुणांच्या जल्लोषात, शेकडो वाहनांच्या ताफ्यात स्वताच्या गुन्हेगारीचे उदात्तीकरण करुन घेतले. विशेष म्हणजे या दोघांना त्यांच्या ठराविक साथीदारांसह या जल्लोषासाठी पुन्हा दोन दिवस तुरुंगात टाकले आणि पुन्हा जामिनावर बाहेरही आणले. एकंदरच पुण्यासारख्या सांस्कृतिक वारसा लाभलेल्या शहरात न्याय, सुरक्षा आणि कायद्याचे गुन्हेगारांच्या जल्लोषात धिंडवडे निघत असल्याचेच हे चित्र आहे.
राजरोसपणाने आपली संपत्ती, आपले बॅडीगार्ड, हजारो तरुणांची फौज, गाडयांचे ताफे मिरवणारे हे गुन्हेगारच भविष्यात पुण्याच्या राजकीय व्यासपीठावर दिसू लागतील यात शंका नाही. एकंदरच पुणे तिथे काय उणे … !

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button