राजकारण

सचिन वाझेच्या कोठडीत ७ एप्रिलपर्यंत वाढ

कोणतीही कबुली दिलेली नाही : सचिन वाझे; 'एनआयए'च्या दाव्यांबाबत शंका!

मुंबई: सचिन वाझे 23 दिवसांपासून राष्ट्रीय तपास यंत्रणे (एनआयए) च्या ताब्यात आहे. त्याला आणखी काही काळ कोठडीत ठेवणे अन्यायकारक होईल, असे वाझेच्या वकिलांनी सांगितले. तर एनआयएचे वकील अनिल सिंग यांनी हा तपास महत्त्वाच्या टप्प्यावर पोहोचला असून आणखी काही गोष्टींच्या चौकशीसाठी सचिन वाझे याची कोठडी महत्त्वाची असल्याचे सांगितले. हा सगळा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने सचिन वाझे याच्या कोठडीत 7 एप्रिलपर्यंत वाढ केली.

‘एनआयए’च्या विशेष न्यायालयात शनिवारी सचिन वाझे आणि ‘एनआयए’च्या वकिलांचा तोडीस तोड युक्तिवाद पाहायला मिळाला. ज्येष्ठ विधिज्ञ आबाद पोंडा हे सचिन वाझे याची बाजू न्यायालयात मांडली. त्यांनी न्यायालयात केलेली एकूण मांडणी पाहता सचिन वाझे यानी ‘एनआयए’समोर अद्याप कोणतीही कबुली दिलेली नाही. त्यामुळे सचिन वाझे पूर्णपणे चेकमेट झाल्याच्या ‘एनआयए’च्या हवाल्याने करण्यात येणाऱ्या दाव्यांमध्ये कितपत तथ्य आहे, अशी शंका आता उपस्थित झाली आहे.

मिठी नदीत नेमक्या जागी वस्तू कशा सापडल्या?

काही दिवसांपूर्वीच एनआयएच्या अधिकाऱ्यांनी सचिन वाझेला मिठी नदीच्या परिसरात नेले होते. एनआयएच्या दाव्यानुसार, यावेळी सचिन वाझे याच्या सांगण्यानुसार मिठी नदीतून वस्तू बाहेर काढण्यात आल्या. यामध्ये सीसीटीव्ही फुटेजचा डीव्हीआर, संगणक आणि सीपीयू अशा गोष्टींचा समावेश होता. मात्र, वाझे यांचे वकील आबाद पोंडा यांनी या सगळ्याविषयी शंका उपस्थित केली. मिठी नदी ही 17.84 किलोमीटर इतकी लांब आहे. तिची खोली जवळपास 70 मीटर इतकी आहे. मग सचिन वाझे यांनी फेकलेल्या वस्तू इतक्या दिवसांनी त्याच जागेवर कशा काय सापडल्या, असा सवाल आबाद पोंडा यांनी विचारला. या माध्यमातून त्यांनी एकप्रकारे या वस्तू एनआयएनेच प्लांट केल्याचे सूचित केले आहे.

सचिन वाझेंच्या अटकेनंतर खात्यातून 26 लाख रुपये काढले

राष्ट्रीय तपास यंत्रणेचे वकील अनिल सिंग यांच्या दाव्यानुसार, सचिन वाझेला अटक झाल्यानंतर त्यांच्या खात्यातून 26 लाख रुपये काढण्यात आले. आता या खात्यात फक्त 5 हजार रुपये शिल्लक आहेत. तसेच वाझेच्या डीसीबी बँकेतील वाझे यांच्या लॉकरमधील कागदपत्रे ‘एनआयए’च्या हाती लागली आहेत. या कागदपत्रांची चौकशी सुरु असल्याचे अनिल सिंग यांनी सांगितले. मात्र, सचिन वाझेच्या वकिलांनी हा आरोप फेटाळून लावला. ज्या खात्यामधून 26 लाख रुपये काढण्यात आले ते संयुक्त खाते (Joint Bank Account) आहे. तसेच माझ्या अटकेनंतर हे पैसे काढले गेले असतील तर तो एनआयएचा कमकुवतपणा आहे, असेही सचिन वाझेने म्हटले.

आतापर्यंत एनआयए सीसीटीव्ही फुटेजच्याआधारे सचिन वाझे यांना कोंडीत पकडू पाहत होती. मात्र, आता वाझे यांनीदेखील सीसीटीव्ही फुटेज सर्व गोष्टी स्पष्ट करेल, असा उलट दावा केला आहे. सीसीटीव्ही फुटेजचा तब्बल 120 टीबी डेटा एनआयएकडे आहे. या फुटेजमध्ये कोणीही छेडछाड करु शकत नाही, अशी टिप्पणीही सचिन वाझेने केल्याचे समजते.

‘एनआयए’ला कोणतीही कबुली दिली नाही: वाझे

सचिन वाझे हे अंबानी स्फोटक प्रकरणात पुरते अडकल्याचे चित्र भाजपच्या नेत्यांकडून रंगवले जात असले तरी प्रत्यक्षात सचिन वाझे यांनी अद्याप कोणत्याही कृत्याची कबुली दिलेली नाही. माझ्यावरील सर्व आरोप खोटे आहेत. अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या जिलेटीनचा आरोपही माझ्यावरच लावण्यात आला, असे सचिन वाझेने म्हटले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button