रुचिरा बॅनर्जी यांची सीबीआयकडून दीड तास चौकशी

कोलकाता: पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर आली आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. यासोबतच राजकीय नेत्यांकडून पक्षांतरदेखील जोरात सुरू आहे. विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी तृणमूल काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षात थेट संघर्ष होणार आहे. त्याची झलक काही दिवसांपासून पाहायला मिळत आहे.
केंद्र सरकारकडून तपास यंत्रणांचा गैरवापर होत असल्याचा आरोप विरोधकांकडून वारंवार केला जातो. पश्चिम बंगालमध्येदेखील सध्या हाच मुद्दा गाजत आहे. कोळसा घोटाळ्यात तृणमूलचे खासदार अभिषेक बॅनर्जी यांच्या पत्नी रुचिरा बॅनर्जी यांना सीबीआयनं समन्स बजावलं होतं. सीबीआयनं मंगळवारी त्यांची दीड तास चौकशी केली. त्यानंतर सीबीआयचं पथक रुचिरा यांच्या घरातून निघालं. रुचिरा यांच्या चौकशीतून सीबीआयला समाधानकारक उत्तरं मिळालेली नाहीत. त्यामुळे सीबीआयकडून पुन्हा रुचिरा यांची चौकशी होऊ शकते.
पश्चिम बंगालमध्ये महाराष्ट्रासारख्याच घडामोडी
अभिषेक बॅनर्जी बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूलच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांचे भाचे आहेत. ते तृणमूलचे खासदार आहेत. संजय राऊत मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय मानले जातात. संजय राऊत खासदार आहेत. अभिषेक बॅनर्जी यांच्या पत्नी रुचिरा राजकारणात सक्रिय नाहीत. राऊत यांच्या पत्नी वर्षादेखील राजकारणात सक्रिय नाहीत.