राजकारण

राज्यात नामर्दांचे सरकार : चित्रा वाघ

मुंबई: पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात भारतीय जनता पक्षाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. २२ वर्षांच्या एका मुलीचा जीव जातो. वनमंत्री संजय राठोड यांच्याविरोधात अनेक महत्त्वाचे पुरावे समोर आले आहेत. मात्र तरीही कारवाई होत नाही. राज्यात नामर्दांचं सरकार आहे, अशी घणाघाती टीका चित्रा वाघ यांनी केला आहे. सरकार, पोलीस दलाकडून बलात्काऱ्याला वाचवण्याचा प्रयत्न होत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला.

संजय राठोड यांच्याविरुद्ध मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत शांत बसणार नाही. एका बलात्काऱ्याला वाचवण्यासाठी तिन्ही पक्ष एकत्र आले आहेत. सत्तेतील पक्षांची अशी एकी पहिल्यांदाच दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसनं धनंजय मुंडेंना वाचवलं. आता शिवसेना संजय राठोड यांना वाचवत आहे. हा चुकीचा पायंडा राज्यात पडत आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज मुख्यमंत्री नसते, तर त्यांनी राठोड यांना फाडून खाल्लं असतं, अशा शब्दांत वाघ यांनी हल्लाबोल केला.

पूजा चव्हाणच्या घरात एक मोबाईल सापडला. तो लॉक होता. पण नोटिफिकेशन पॉप होत होते. त्यात संजय राठोड नावाच्या व्यक्तीचे तब्बल ४५ कॉल होते. हा संजय राठोड नेमका कोण, याचं उत्तर पुणे पोलीस देणार का, असा प्रश्न वाघ यांनी उपस्थित केला. हा प्रश्न एकट्या पूजा चव्हाण, संजय राठोडचा नाही. महिलांवर होणाऱ्या अत्याचारांचा आहे. स्वत: शेण खायचं आणि समाजाला वेठीला धरायचं असा प्रकार सुरू आहे. दहा लाख लोक जमवले, तरीही निर्दोषत्व सिद्ध होत नाही, असं वाघ म्हणाल्या.

पूजा चव्हाणचा मृत्यू झाल्यानंतर सकाळी पुणे पोलीस कंट्रोलला अरुण राठोडनं एक फोन आला. तो फोन एका महिला कर्मचाऱ्यानं घेतला. राठोडनं घडलेला प्रकार महिलेला सांगितला. त्या महिलेनं राठोडला एक फोन नंबर दिला. मग राठोडनं त्यानंतर दिलेल्या नंबरवर कॉल केला. त्या व्यक्तीनं एकाला कॉल कॉन्फरन्सवर घेतलं. मग राठोडनं घडलेला संपूर्ण प्रकार त्या तिसऱ्या व्यक्तीला ऐकवला. पुणे पोलिसांनी कंट्रोल रूममधून दिलेला नंबर तो कोणाचा, कॉल कॉन्फरन्सवरील ती तिसरी व्यक्ती कोण, असे प्रश्न वाघ यांनी विचारले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button