मेट्रोमॅन आणि कोकण रेल्वेचे निर्माते ई. श्रीधरन भाजपात प्रवेश करणार

नवी दिल्ली : केरळमध्ये यावर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये चांगली कामगिरी करण्यासाठी भाजपाने कंबर कसली आहे. त्यासाठी भाजपाकडून अनेक जणांना पक्षासोबत जोडून घेतले जात आहे. दरम्यान देशाचे मेट्रोमॅन आणि कोकण रेल्वेचे निर्माते म्हणून ओळख असलेले ई. श्रीधरन हे सुद्धा राजकारणात उतरणार असून, ते भाजपात प्रवेश करणार आहेत. भाजपाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार ई. श्रीधरन हे २१ फेब्रुवारी रोजी भाजपामध्ये प्रवेश करणार आहेत.
केरळमधील भाजपाचे प्रदेशाध्यक्ष के. सुरेंद्रन यांनी सांगितले की, भाजपा लवकरच राज्यात विजय यात्रा अभियान सुरू करणार आहे. यादरम्यान, ई. श्रीधरन हे पक्षाचे सदस्यत्व स्वीकारतील. ई. श्रीधरन यांच्या कुशल नेतृत्वामुळे दिल्ली मेट्रोचे स्वप्न साकार झाले होते. कोकण रेल्वेसारखा अवघड प्रकल्पही ई. श्रीधरन यांच्या कौशल्यामुळे प्रत्यक्षात उतरला होता. ई. श्रीधरन यांच्या या कार्याचा गौरव भारत सरकारने पद्मविभूषण, पद्मश्रीसारखे पुरस्कार देऊन केला आहे.
दिल्ली मेट्रोप्रमाणेच कोलकाला मेट्रो, कोची मेट्रोसह देशातील अनेक मोठ्या मेट्रो प्रकल्पांमध्ये ई. श्रीधरन यांचे योगदान राहिले आहे. त्यामुळेच त्यांचा भारताचे मेट्रोमॅन म्हणून आदराने उल्लेख केला जातो.