महाराष्ट्रात मध्यावधी निवडणुकीची चाचपणी!

मुंबई (प्रतिनिधी) : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील चांदा ते बांदा अशा विविध जिल्ह्यांमध्ये फिरून राष्ट्रवादी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधत आहेत. दुसरीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही शिवसेनेच्या महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेत २४ ते २७ फेब्रुवारी या कालावधीत संघटनात्मक बांधणीसाठी शिवसंपर्क अभियान राबविण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यात मध्यावधी निवडणुकीची तयारी सुरू असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
महाविकास आघाडी सरकारच्या मंत्र्यावर होणारे गंभीर आरोप आणि भाजपचा आक्रमक पवित्रा, या पार्श्वभूमीवर शिवसेना, राष्ट्रवादीने सुरू केलेल्या जनसंपर्क अभियानामुळे राज्यात मध्यावधी निवडणुकीचा अंदाज घेतला जात असल्याचे बोलले जाते. राष्ट्रवादी काँग्रेसने परिवार संवाद यात्रेचे आयोजन केले, तर आता शिवसेनाही शिवसंपर्क अभियान राबवणार आहे.
नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालात राष्ट्रवादी, शिवसेनेला चांगलं यश मिळालं, त्यामुळे दोन्ही पक्ष आणखी संघटनात्मक बांधणीसाठी संवाद दौरे काढत आहेत, तर दुसरीकडे मरगळलेल्या काँग्रेसमध्येही फेरबदल झाल्याचं दिसून येतं आहे. प्रदेशाध्यक्षासह ६ कार्यकारी अध्यक्षांची निवड करून काँग्रेसही तयारीला लागली आहे. त्याचसोबत भाजपाही विविध पातळीवर बैठका घेत आहेत. महाविकास आघाडी सरकारमधील तिन्ही पक्षांची सध्या सुरु असलेली संघटनात्मक बांधणी आणि राज्यभर संवाद दौरे यातून तिन्ही पक्ष मध्यावधी निवडणुकीची तयारी करत असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.
राज्य मंत्रिमंडळातील धनंजय मुंडे आणि संजय राठोड या मंत्र्यांवर गंभीर आरोप झाले आहेत. धनंजय मुंडे यांच्या प्रकरणात भाजपाने इतकी आक्रमकता दाखवली नाही तितकी शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांच्या प्रकरणात दाखवली आहे. धनंजय मुंडे यांचे प्रकरण ताजे असतानाच महाविकास आघाडी सरकारच्या दुसऱ्या मंत्र्यावर अशाप्रकारे गंभीर आरोप झाल्याने ठाकरे सरकार अडचणीत सापडले. त्याचवेळी भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याला जास्त काळ विरोधी पक्षात राहायचं नाही असं विधान केले आहे. या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडी पाहता मध्यावधी निवडणुकीची चाचपणी सुरू असल्याचे चित्र आहे.